मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. २७ ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाकांक्षी आणि जनहितकारी १२ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना (Farmer) दिवाळीपूर्वी (Diwali) तातडीने आर्थिक मदत देण्यापासून ते पायाभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि औद्योगिक विस्तारासंदर्भातील विविध प्रस्तावांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीतील १२ प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे
१. शेतकऱ्यांना ५ हजारांचा अग्रीम (मदत व पुनर्वसन विभाग)
राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील १.५० कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत दिली जाईल. पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट ही मदत मिळणार असून ही रक्कम थेट डीबीटी (DBT) द्वारे बँक खात्यात जमा होणार आहे.
२. ‘मातोश्री शेत-पाणंद रस्ते योजने’ला गती (रोजगार हमी योजना विभाग)
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना ‘विकसित भारत – जी राम जी योजने’सह इतर योजनांच्या समन्वयातून सुरू ठेवली जाईल. या योजनेला जिल्हास्तरीय योजनेची मान्यता देण्यात आली असून, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामांना गती दिली जाईल.
३. दिव्यांगांच्या कल्याणासाठी १% निधी (दिव्यांग सक्षमीकरण विभाग)
दिव्यांग व्यक्तींचे कल्याण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) एकूण निधीपैकी १ टक्का निधी राखीव ठेवून वापरण्यास मंजुरी देण्यात आली.
हे देखील वाचा : शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, ४ लाख १५ हजार थकबाकीदारांना फायदा
४. जलसंपदा विभागाचा ३९,७२२ पदांचा सुधारित आकृतिबंध (जलसंपदा विभाग)
जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे लक्ष्य असून, वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी १४५० सिंचन शाखा कार्यालयांसाठी नवीन पदनिर्मिती आणि ‘सिंचन सहाय्यक’ या नवीन संवर्गास मंजुरी देण्यात आली.
५. पुण्यातील लोहगाव येथे ‘भारत मंडपम’ (नगर विकास विभाग)
पुण्यातील लोहगाव येथील क्रीडा मैदानाच्या आरक्षणात बदल करून नवी दिल्लीतील प्रसिद्ध ‘भारत मंडपम’च्या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवरील भव्य प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
६. इलेक्ट्रिक वाहनांसाठी बजाज ऑटोला ६६.८२ कोटी (परिवहन विभाग)
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीला ई-व्हेईकल (EV) निर्मितीला चालना देण्यासाठी ६६ कोटी ८२ लाख रुपयांचे सहाय्य देण्यास मंजुरी.
७. चिपी विमानतळ सेवा नव्या दमाने सुरू (विमानचालन विभाग)
सिंधुदुर्ग (चिपी) – नवी मुंबई आणि नवी मुंबई – सिंधुदुर्ग या हवाई मार्गावर विमान सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांना १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याचा निर्णय घेण्यात आला.
८. शिरूर ताजबंद सूतगिरणीला शासन अर्थसहाय्य (वस्त्रोद्योग विभाग)
लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद (ता. अहमदपूर) येथील श्री मल्हारराव होळकर भटक्या विमुक्त जमाती सहकारी सूतगिरणीला राज्य सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाईल.
९. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) धोरणात सुधारणा (नियोजन विभाग)
महाराष्ट्र PPP धोरणात सुधारणा करून प्रकल्पांची छाननी, तत्वतः मान्यता, निविदा प्रक्रिया आणि बोली या टप्प्यांचे अधिक सुटसुटीत व पारदर्शक नियोजन करण्यास मंजुरी देण्यात आली.
१०. जिल्हा परिषदेत ‘सहायक प्रशासन अधिकारी’ एकच पद (ग्राम विकास विभाग)
जिल्हा परिषदांमधील लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील ‘कनिष्ठ प्रशासन अधिकारी’ (S-13) आणि ‘सहायक प्रशासन अधिकारी’ (S-14) हे दोन संवर्ग एकत्रित करून आता ‘सहायक प्रशासन अधिकारी’ (S-14) असा एकच संवर्ग ठेवला जाईल.
११. धुळ्यात MIDC च्या विस्तारासाठी जमीन (महसूल विभाग)
धुळे जिल्ह्यातील मौजे रावेर येथील २८९ हेक्टर ६९ आर जमीन एमआयडीसीच्या (MIDC) विस्तारासाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली.
१२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अधिनियमात सुधारणा (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
विद्यापीठाच्या अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून, प्र-कुलगुरू पदावरील व्यक्तीस पदावरून हटवण्याचे अधिकार आता कुलपती (राज्यपाल) यांना मिळतील.




