Sunday, July 7, 2024
Homeनगरनगरला नको…बीड-आष्टीलाच शिकू…

नगरला नको…बीड-आष्टीलाच शिकू…

नगरमधील 11 वीच्या विद्यार्थ्यांचा बदनाम महाविद्यालयांकडे ओढा

अहमदनगर |श्रीराम जोशी| Ahmednagar

- Advertisement -

वैद्यकीय-अभियांत्रिकी-वास्तूविशारद वा अन्य उच्च शिक्षणासाठी आता स्वतंत्र प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पण त्या परीक्षेतही बारावीचे यश काहीअंशी विचारात घेतले जाते. हा टक्केवारीचा काही अंश साध्य करण्यासाठी नगरमधील अकरावीचे विद्यार्थी चक्क बीड, आष्टी, धानोरा यासह काही प्रमाणात पाथर्डीतील महाविद्यालयांमध्ये शिकण्यास प्राधान्य देत आहेत. कॉपी सेंटर्स म्हणून बदनाम असलेल्या या परिसराकडे विद्यार्थ्यांचा असलेला ओढा पाहून नगरमधील नामंवत महाविद्यालये मात्र हादरून गेली आहेत. त्यांची विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने त्यांच्यासमोर प्राध्यापक मंडळी अतिरिक्त तर ठरणार नाहीत ना, अशी भीती पसरली आहे.

नगरमध्ये नगर महाविद्यालय, न्यू आर्टस-सायन्स महाविद्यालय व सारडा महाविद्यालय अशी तीन मोठी महाविद्यालये आहेत. याशिवाय फिरोदिया, समर्थ, रेसिडेन्शियल व अन्य मोठ्या शाळांमध्ये अकरावी-बारावी कनिष्ठ महाविद्यालये आहेत. दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर या महाविद्यालयांच्या प्रशासनाने पुढील प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. दहावीनंतर अकरावीत व बारावीनंतर फर्स्ट इअर प्रवेश सुरू असताना अचानक अकरावीतून बारावीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया संथ झाल्याचे दिसू लागले. उलट, अकरावी झाल्यावर ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) मागण्यासाठी महाविद्यालयाबाहेर रांगच रांग लागू लागली आहे. पुढे शिकायचे नाही, घरात कोणी आजारी आहे व त्यांची देखभाल करायची आहे, बाहेरगावी जाऊन शिकायचे आहे, पुण्या-मुंबईत जाऊन शिकायचे आहे, वडिलांची बदली झाल्याने तिकडे जायचे आहे, अशी अनेकविध कारणे टीसीसाठी दिली जात आहेत.

चर्चेतून बसला धक्का
टीसी मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असल्याने त्याबाबत अडवणूक होत नाही. पण अचानक अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून टीसी मागणीत झालेली वाढ काही प्राध्यापकांना संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधल्यावर धक्कादायक बाब समोर आली व ती समजल्यावर प्राध्यापक मंडळीही हवालदिल झाली आहेत. बदनाम परिसरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यामुळे या मुलांना पाहिजे तेवढे गुण तर मिळतील, पण पुढच्या उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांचे ते काय करणार व तेथे कसे यश मिळवून चांगले करियर कसे मिळवणार, असा प्रश्न प्राध्यापकांच्या मनात आहे. शिवाय, दुसरीकडे बारावीचे वर्ग कमी झाले तर त्यासाठीचे आपल्याकडे नियुक्त प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याचीही भीतीही आहेच.

एजंटकडून मदतीची ग्वाही
काही प्राध्यापकांनी टीसी मागणार्‍या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीड, आष्टी, धानोरा, पाथर्डी येथील कॉपी सेंटर म्हणून बदनाम असणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीसाठी प्रवेश मिळण्यासाठी एजंट फिरत आहेत. विद्यार्थी व त्यांच्या पालकांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन त्याबदल्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण सुरू आहे. बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षेलाही न येता संपूर्ण मार्कांची हमी दिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी नगरमधून टीसी काढून बीड-आष्टीला शिकण्यास प्राधान्य देणे सुरू केल्याने नगरमधील महाविद्यालयीन विश्व मात्र हवालदिल झाले आहे.

क्लासबाहेर हेरले जाते
बारावी म्हटल्यावर अनेकजण अकरावीपासूनच खासगी क्लास लावतात. अशा क्लास बाहेर थांबून अकरावी झालेल्यांना हेरणे व त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा खेळ सुरू असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. यात विद्यार्थी व पालकांची फसवणूक होऊ शकते. ज्या ठिकाणी ही मुले प्रवेश घेत आहेत, त्या ठिकाणी संबंधित महाविद्यालये अस्तित्वात आहेत की नाही, याचीही खात्री नाही. शिवाय अशा ठिकाणांवर चांगले-वाईट उद्योग करून पास होणार्‍या विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असेही प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या