Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्या15 लाख, 30 लाख! लाचखोरांची वाढती भूक!

15 लाख, 30 लाख! लाचखोरांची वाढती भूक!

नाशिक । फारुक पठाण Nashik

नागरिकांची अडलेली कामे करुन देण्यासाठी प्रशासनातील बड्या भ्रष्ट अधिकार्‍यांची लाचखोरीची भूक वाढत चालली आहे. कोणी 15 लाखांची लाच घेतो तर कोणी 30 लाखांची लाच घेत आहे. अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना रंगेहात पकडण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत असला तरी शासनाच्या प्रशासनात हे चालले तरी काय? असा प्रश्न सामान्य माणसांना पडत आहे. लाचखोरीच्या वाढत्या प्रकारांनी सामान्य जन संभ्रमित झाले आहेत.

- Advertisement -

भ्रष्टाचारमुक्त भारत होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असताना नाशिक विभागातील अनेक प्रशासनातील अधिकारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकले जात आहेत. प्रशासनातील लाचखोरीचे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी शासन विविध योजना तयार करते. मात्र प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी त्याचा लाभ सामान्यांना मिळवून देण्यासाठी थेट लाचेची मागणी करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान मागील काही महिन्यांपासून नाशिक लाचलुचपत विभागाने केलेली कारवाई उल्लेखनीय ठरली आहे. जिल्हा उपनिबंधक सतीश खरेला 30 लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले होते. जिल्हा हिवताप अधिकार्‍यांसह दोघांना 10 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. नाशिक मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर व लिपिक नितीन जोशी यांना 55 हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. धनगर यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यावेळी तब्बल 85 लाख रुपयांची रोकडसह इतर लाखो रुपयांचा मुद्देमाल एसीबी पथकाच्या हाती लागला होता. शनिवारी (दि. 5) 15 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय 44) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वरिष्ठ अधिकारीच लाच घेत असतील तर सामान्य नागरिकांनी कुठे दाद मागायची कुठे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

लाचखोर पकडण्यात नाशिक अव्वल

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी व लाचखोर यांच्या विरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2023 ते 3 ऑगस्ट 2023 पर्यंत नाशिक विभागात तब्बल 104 गुन्हे दाखल करून तब्बल 190 संशयीत आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. नाशिक लाच लूचपत विभाग आता पर्यंतच्या कारवाईत राज्यात अव्वल क्रमांकावर आहे.

मागील काही दिवसांत लाचलुचपत विभागाने मोठ्या माशांवर कारवाई करत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. यामध्ये जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना त्यांच्या कॉलेज रोडच्या घरी तब्बल 30 लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. हे प्रकरण ताजे असतानाच हिवताप अधिकारीसह दोघांना दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. अँटी करप्शन ब्युरो हा चर्चेत आला असून शासकीय अधिकारी तसेच सेवकांमध्ये कमालीची धास्ती दिसून येत आहे.

शासनाच्याच गृहविभागाअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडबॅच म्हणून समजला जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आहे. या विभागाकडून वर्षभरात वेगवेगळ्या कार्यालयात वर्ग एकपासून वर्ग चारपर्यंतच्या कर्मचार्‍यांवर सापळे यशस्वी केले जात होते. अधीक्षिका वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे.

निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक मनपाच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागाचे लिपिक नितीन जोशी यांना रंगेहाथ पकडले होते. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच याबाबतची तक्रार एसीबीला प्राप्त झाली होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्वरित दोन अधिकार्‍यांचे पथक महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले. तक्रारदार यांना आतमध्ये पाठवून पैशांची देवाण-घेवाण होताच पथकाने प्रवेश दोन्ही लाचखोरांना ताब्यात घेतले.

.

तक्रार करा, कारवाई होईल

शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी कोणीही लाचेची मागणी करत असेल स्वतः किंवा मध्यस्थीतीमार्फत तर नागरिकांनी लाच लुचपत विभागाकडे तक्रार करावी. यासाठी 1064 हा टोल फ्री क्रमांक असून ही सेवा 24 तास सुरू असते. लाच देणे व घेणे दोन्ही गुन्हे आहेत. तक्रार करणार्‍यांचा नाव गुप्त ठेवण्यात येतो. तशी संपूर्ण काळजी आम्ही घेतो. नागरिकांनी निर्धास्त होऊन तक्रार करावी.

– शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षिका, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या