नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पाण्याचा दुर्भिक्ष सातत्याने वाढू लागला असून जिल्ह्यात असलेल्या ७ मोठे व १७ मध्यम प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध असलेला पाणीसाठा (Water Storage) १६.३७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील २४ धरण समूहांमध्ये संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट एवढा निश्चित केलेला आहे. २०२३ मध्ये हा साठा २० हजार १२२ दशलक्ष घनफूट एवढा (३०.६४ टक्के) होता. यंदा म्हणजेच आजच्या आकडेवारीनुसार उपयुक्त पाणी साठा १० हजार ७४७ म्हणजे १६.३७ टक्के एवढा आहे. त्यामुळे पाऊस (Rain) लांबला तर यंदा पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार १५ जूनपर्यंत राज्यात पाऊस दाखल होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरण (Dam)समूहात १६.३७ टक्के पाणीसाठा असल्याने पाऊस येई पर्यंत हा पाणीसाठा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी धरण समूह, पालखेड धरण समूह व गिरणा खोरे धरण समूह अशा धरण समूहांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. त्यात प्रामुख्याने गंगापूर धरण समूहामधील गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी व आळंदी याधरण समूहात आजचा उपयुक्त साठा हा २ हजार २४६ दशलक्ष घनफूट म्हणजेच २२.०९ टक्के एवढा आहे. तर पालखेड धरण समूहात १०.४३ टक्के आणि ओझरखेड व दारणा धरण समूहात १६.४३ टक्के व गिरणा खोर्यामध्ये १७.४५ टक्के इतका पाणीसाठा आहे.
दरम्यान, एकीकडे जिल्ह्यातील पाणीसाठा १६ टक्क्यांवर आला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी तीन तालुक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता ठिक दिसून येत आहे. तर उर्वरित १२ तालुक्यांमधील अनेक गाववाडे आणि वस्त्यांवर ३९० टँकरच्या ८७१ फेर्यांद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने लवकर हजेरी लावल्यास अनेक नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.नाहीतर नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते.
जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक नागरिकांची टँकरच्या ८७१ फेर्यांद्वारे भागवली जातेय तहान
सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी तीन तालुक्यांमध्ये पाण्याची उपलब्धता ठिक आहे. पंरतु, उर्वरित बारा तालुक्यांमधील १२९७ गाववाडे-वस्त्यांवरील सहा लाख ७२ हजार ७६२ नागरिकांची तहान ३९० टँकरच्या ८७१ फेर्यांद्वारे भागवली जात आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक टँकरच्या फेर्या नांदगाव तालुक्यात सुरु आहे. सध्याच्या स्थितीत नांदगाव तालुक्यात ७७ टँकरद्वारे १७२ फेर्या, येवला तालुक्यात ५७ टँकरद्वारे ११८ फेर्या, मालेगावमध्ये ४९ टँकरद्वारे ९८ फेर्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय सिन्नरमध्ये ४४ टँकरद्वारे १२४ फेर्या, बागलाणमध्ये ४२ टँकरद्वारे ६३ फेर्या, देवळामध्ये ३३ टँकरद्वारे ७० फेर्या, चांदवडमध्ये ३३ टँकरद्वारे ९० फेर्या, पेठमध्ये १६ टँकरद्वारे ४० फेर्या तर इगतपुरीमध्ये १६ टँकरद्वारे ४१ फेर्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी जिल्हाभरातील ६३ विहीरी गावांसाठी तर १३६ विहीरी या टँकरसाठी जिल्हा प्रशासनाने आरक्षित केलेल्या आहेत.
दुष्काळी भागात ३ हजार ७०० टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील एकूण २५ जिल्ह्यांमधील ३ हजार ७२ गावे आणि तब्बल ७,९३१ वाड्यांमध्ये एकूण ३ हजार ७६१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ८७४ टँकरने पाणीपुरवठा हा राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सुमारे तेराशे गावांना फक्त ३०५ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात होता. तसेच राज्यात सर्व लहान मोठ्या धरणांची संख्या २ हजार ९९७ असून या धरणांमधील पाणीसाठा फक्त २२. ६४ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा ३१. ८१ टक्के होता.