Monday, November 25, 2024
Homeब्लॉगब्लॉग : १९ मार्च...!

ब्लॉग : १९ मार्च…!

आज बर्‍याच दिवसांनी ऑफिसमध्ये आलो. सुदैवाने आमच्या नथूभाऊ आणि मनिषाताईंनी आधीच साफसफाई केली होती.

साधारणपणे बारा आठवड्यांनी ऑफिसमध्ये आलो होतो. बरंही वाटत होतं, थोडं चुकल्यासारखं आणि उदाससुद्धा! रस्त्यावरची चहल-पहल पाहून माणसात आल्यासारखे आणि परत तेच बेशिस्त प्रकार बघून उदास!

- Advertisement -

टेबलवरचे कॅलेंडर अजूनही १९ मार्च ही तारीख दाखवत होते. अरे बाप रे, बारा आठवडे! आणि झालेले सर्व चित्रपटासारखे क्षणात डोळ्यांपुढे तरळून गेले. सुरुवात झाली होती २०१९ वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून.

आम्ही सर्व मित्रमंडळी सहकुटुंब जमतो दर डिसेंबर ३१ ला न चुकता! या वेळेस बंगळुरूजवळ भेटलो. अरे चीनमध्ये कुठलीशी साथ आली आहे, असे बोलणे झाले. त्यानंर त्याला ‘कोविड १९’ असे नामकरणही झाले, पण तेव्हा जाणवले नाही की, ही एक कालक्रमणेची एक खूण होईल म्हणून.

थोडी घरघर तेव्हाच सुरु झाली होती. चाहूलच होती ती! त्यानंतर पूर्ण जानेवारी, फेब्रुवारी व्यवस्थित, वैयक्तिक आणि कार्यालयीन कामाच्या भटकंतीत गेला. तोपर्यंत तमाम जग ‘कोविड १९’च्या बाबींवर जागृत झाले होते.

मी स्वतः भटकंतीकरता चेरी ब्लॉसमच्या ऋतूकरता सर्व कार्यक्रम आखले होते. त्यामुळे आणि इतर कारणांमुळे सतत वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून याची माहिती घेत होतो. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अगदी हैद्राबादमध्ये दुबई होऊन प्रवास करून आलेली एक व्यक्ती सापडेपर्यंत आमची तिथे नियमित चक्कर होती.

तोपर्यंत युरोप आणि इतर देश या ‘कोविड’नामक व्हायरसच्या अमलाखाली आले होते. या व्याप्तीनंतर आमचे सर्व दौरे आणि भटकंतीसुद्धा लॉक्ड आणि आम्ही लॉक्डडाऊन!

पुढच्या बारा आठवड्यांतून अधिक काळ हा सुरुवातीला काळजी, उत्सुकता, सकारात्मकता, अलगी- विलगीकरण, रोजचे अपडेट ते थोडे फार रुटीन, इथपर्यंत येऊन पोहचला.

आणि उजाडला दिवस थोडे मोकळे होण्याचा, फिरण्याचा! चेहर्‍यावर मास्क, सगळीकडे सॅनिटायझर, आखलेले चौकोन, फोनवर ‘कोविड’च्या सूचना हा झालेला मोठ्ठा बदल!

आज ऑफिसमध्ये आल्यावर ती तारीख बघून जाणवले, अरे एवढे काही झालेय या बारा आठवड्यांत?

कालक्रमणेच्या प्रवासात ‘कोविड १९’ हा जणू एक ‘मैलाचा दगड’ जो म्हणतात तोच झालाय. आपण शाळेत असताना कालक्रमणाचे मोजमाप, इ.स. पूर्व हा संदर्भ येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जोडून करण्यात येत होता. तर आता या व्हायरसशी जोडून ‘कोविड १९’ असे म्हणून होईल.

उद्या कदाचित कोणी सांगेल, अरे २०१९ साल म्हणजे ‘कोविड १९’आधी असे नव्हते. कोणी मास्क नाही घालायचे. सर्व मुक्त होते.

तशी कॅलेंडर वरची १९ तारीख बघून वाटले; अरे आधी तर असे नव्हते. चला, हाही एक कालक्रमणेतला महत्वाचा दगड; ज्याने सारे जगच बदलवले.

त्याचा संदर्भ तर राहणारच, इतिहासात आणि वर्तमानात आपणच जगतोय त्याच्या!

– किरण वैरागकर, २१०६२०२०

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या