Sunday, March 30, 2025
Homeनाशिकआषाढी वारीतील दिंड्यांंना वीस हजार रुपयांचे अनुदान - मुख्यमंत्री

आषाढी वारीतील दिंड्यांंना वीस हजार रुपयांचे अनुदान – मुख्यमंत्री

वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना २० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केली. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्वनियोजनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच यंदाही टोल माफी देण्यात येईल, असेही जाहीर केले. तसेच वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. या निर्णयाचे समस्त वारकरी संप्रदायाने टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले.

आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती. यंदाही चांगले नियोजन करून, आषाढी वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी सरकारच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे आहे. सरकारने कमी वेळात शेतकरी, माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतले आहेत. आषाढी वारीसाठी विभागीय आयुक्तांसह विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे. वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालायतून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली गेली आहे. आषाढ वारीतील वारकऱ्याचा दुर्देवाने अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गतवर्षीपासून विमा योजना लागू केली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी व्हावी यासाठी एसओपी निश्चित केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे. या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारीसाठी जास्तीच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी सक्षम आणि तज्ज्ञ यंत्रणांचा सहभाग घेण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांना कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा- महाआरोग्य शिबिरांचे आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचे काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गृह विभागाने आवश्यक त्या गोष्टीची वेळीच दखल घेऊन पुरेपूर तयारी करण्याचे निर्देश बैठकीत दिले.

या बैठकीला आमदार समाधान आवताडे, मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ बंडातात्या कराडकर, अक्षयमहाराज भोसले, श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विश्वस्त माधवी निगडे-देसाई, यांच्यासह मानाच्या दहा पालख्यांचे प्रमुख उपस्थित होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

MNS Politics : मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; अविनाश जाधवांच्या फोटोला...

0
पालघर | Palghar मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुंबईत (Mumbai) गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) निमित्ताने भव्य सभा पार पडत आहे. पण दुसरीकडे पालघरमध्ये (Palghar)...