मुंबई | Mumbai
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने स्वतःचा उमेदवार न दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. या प्रभागातून नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उद्धव ठाकरेंनी तसे अधिकृत पत्रच काढले आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ठाकरे गटाने नील सोमय्या यांच्या विरोधात एक पुरस्कृत उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे आता या प्रभागातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
प्रभाग १०७ हा प्रामुख्याने मराठी भाषिक मतदारांचा प्रभाग आहे. दिनेश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हा वॉर्ड मराठी भाषिकांचा असल्याने तो आम्हाला (ठाकरे गट) हवा होता, तसेच राष्ट्रवादीलाही हवा होता. मात्र, पुढे काहीतरी गडबड होईल, अशी शंका आम्हाला आधीपासूनच होती. म्हणूनच सावधगिरी म्हणून मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.”
तर संजय राऊत म्हणाले, किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असले तर भाजपचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांच्या सर्व भूमिका महाराष्ट्रविरोधी आहेत. त्यांनी शालेय शिक्षणात मराठी सक्तीलाही विरोध केला आहे. त्यासाठी ते उषा मेहतांसोबत कोर्टात गेले होते. महाराष्ट्रातील अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्यांनी अमित शाहांच्या सांगण्यावरुन मोहीम उघडली. त्यानंतर हे सर्व भ्रष्टचारी भाजपत गेल्यावर किरीट सोमय्यांचे तोंड शिवले गेले, अशी टीका संजय राऊतांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, वार्ड क्रमांक १०७ मध्ये जागा वाटपात त्या जागेचा हट्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला. आम्ही त्यांना सांगितले होते की, ती जागा अत्यंत नाजूक आहे. आम्हाला ती जागा लढणे गरजेचे आहे. पण, त्यांनी सांगितले की, आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग नाईलाजाने आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. आम्ही सगळ्यांनी ठरवले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभे राहायचे. पण, नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात १०७ वॉर्ड देखील सामील झाला. त्यानंतर मुलुंडचे नाXX पोपटलाल बिनविरोध, बिनविरोध, माझ्याविरुद्ध कोणी नाही, असे नाचायला लागले. मात्र तसे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुचल्यानंतर आमचे कडवट शिवसैनिक दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला आहे. त्यांचा अर्ज कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत, हे पत्र दिलेले आहे. नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. दिनेश जाधव यांना फक्त मशाल चिन्ह मिळू शकलेले नाही. त्यांचे चिन्ह दूरदर्शन संच आहे.पण, काटे की टक्कर होणार आहे. ते बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना आमच्याशी संघर्ष करावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.




