Friday, January 23, 2026
Homeमुख्य बातम्यापडसाद : गर्वाचे घर खाली..

पडसाद : गर्वाचे घर खाली..

नेत्यांचे अहंकार, स्वतविषयीचा फाजील आत्मविश्वास आणि वास्तवाचे भान नसणे यामुळे काय होऊ शकते याचा अनुभव राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने महापालिका निवडणुकीत घेतला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष आणि स्थानिक बलाढ्य नेत्यांवर विसंबणे याचाही पक्षाला फटका बसल्याचे दिसते. राष्ट्रवादीला अवघ्या चार जागांवर विजय मिळाला असला तरी त्यापैकी हेमलता पाटील या व्यक्तिगत करिश्म्यावर तर सीमा ठाकरे या पती रंजन ठाकरे यांच्या सर्वांशी जमवून घेण्याच्या क्लृप्तीमुळे निवडून आल्या आहेत. दुबई वॉर्डमधून ज्योती गांगुर्डे तर अंबडमधून किरण राजवाडे विजयी झाले यात पक्षाचा वाटा निश्चित आहे. पण अनेक ठिकाणी केवळ लढायचे म्हणून लढण्याच्या बेफिकीर वृत्तीचा फटका बसला.

- Advertisement -

खरे तर निवडणुकीची सुरुवातच मुळी नेत्यांच्या अहंकाराच्या दर्शनाने झाली. प्रारंभी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नऊ जणांची एक सुकाणू समिती नियुक्त केली होती. सदर बैठकीची सूत्रे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे आली आणि त्यांनी भुजबळ फार्मवर बैठक आयोजित करताच या समितीतील चार ते पाच जणांनी त्यावर आक्षेप घेत पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्याचा आग्रह धरला. तो अर्थातच फेटाळला गेला. तेव्हापासून ही काही मंडळी तटस्थ झाली. उमेदवारी निवडीतही त्यांनी फारसा सहभाग घेतला नाही. शिवसेनेबरोबर युती केल्यानंतरही आमदार सरोज अहिरे यांनी नाशिकरोडच्या काही प्रभागात मी ठरवेल तसेच होईल, अशी भूमिका घेत उमेदवार उभे केले. केवळ एवढेच नव्हे तर देवळाली गाव व विहितगाव येथे प्रचार करतांना त्यांनी अत्यंत आक्रमकता तर दाखविलीच शिवाय स्थानिक नेत्यांनाही बाजूला केले.

YouTube video player

भगूरमध्ये विजय करंजकर यांची सत्ता उलथविण्यात आपण कसे यशस्वी झालो याचे गुणगान करुन येथील सर्व आठ जणांना विजयी करण्याची जबाबदारी आपली, असे थेट आव्हानच त्यांनी दिले होते. दुर्दैवाने त्यांचा हा अहंकार पक्षातील अनेकांनी तर मानवला नाहीच, पण शिवसेनेच्या विचारांच्या मतदारांनाही तो डिवचल्या सारखा वाटला आणि मग त्यांनी सगळे पॅनलच उबाठाच्या पारड्यात टाकले. विशेष म्हणजे ज्या जागेवर त्या स्वत पूर्वी विजयी झाल्या होत्या तेथील जागाही पक्षाने गमावली. उमेदवारांची निवड, त्यांचे गट असे सगळचे गणित चुकत गेले. अर्थात त्यांनी जीवापाड प्रयत्न जरुर केले, पण त्यांनी इतक्या लोकांचा रोष ओढवून घेतलेला आहे की या निमित्ताने अनेकांनी ही संधी साधून त्यांचा काटा काढला.

पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर गर्वाचे घर खाली झाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली, ती त्यामुळेच. याशिवाय मनसे, काँग्रेससह काही पक्षांचे बडे नेते राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक होते, पण पक्षाची सूत्रे फिरल्यानंतर त्यांनी आपले विचार बदलले असेही आता बोलले जात आहे. पक्षातील काही जणांनी तर हमखास विजयी होणार्‍या काहींना भाजप वा इतर पक्षात पाठवून दिल्याचाही आरोप आता दबक्या आवाजात होऊ लागला आहे. आमदार हिरामण खोसकरांनी मुलीला उभे करुन हात पोळून घेतला. समता परिषदेचे कार्यकर्ते इतर पक्षांमधून लढले, याचाही अधिकृत उमेदवारांना फटका बसला. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी काही ठिकाणी त्यांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले गेल्याने दोघांचाही तोटा झाला.

याशिवाय पुणे व पिंपरी चिंचवड येथे पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपविरोधात अत्यंत आक्रमक आघाडी उभारली असतांना नाशिकमध्ये मात्र तशीच परिस्थिती असतांनाही भाजपविरोधात आवाज उठविण्याची हिंमत नेत्यांनी दाखविली नाही. पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी नाशिककडे पूर्ण दुर्लक्ष केले. छगन भुजबळ यांच्या आजारपणामुळे त्यांच्या सक्रियतेवर मर्यादा आल्या. साहजिकच त्याचाही परिणाम झाला. पक्षात काहींनी अशी एकेका प्रभागाची हमी घेतली खरी पण, प्रत्यक्षात जमिनीवरील कामाबाबत ही मंडळी कमी पडली. प्रभागातील राजकीय वास्तवाची माहिती नसल्यामुळेच हे घडले, हे उघड झाले. प्रारंभी यासंदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार्‍यांनाही गप्प बसविण्यात आले.

भाजपने युती करावी यासाठी गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ तसेच आमदार हिरामण खोसकर हे अजिजी करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तर पक्षाची उरलीसुरली पतही गेली. भाजप साध्या जागावाटपाच्या चर्चेसाठीही वेळ देत नाही आणि राष्ट्रवादीचे मंत्री हात जोडून विनंती करतात हा प्रसंगच भयानक होता. त्याचा फार नकारात्मक परिणाम झाला. हे कदाचित पक्षाचे नेते मान्य करणार नाहीत, परंतु राष्ट्रवादीच्या ध्येयधोरणाशी विपरीत असे हे वर्तन असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासालाही तडा गेला. सुरुवातच अशी डळमळीत झाल्याने नंतर पक्ष सावरुच शकला नाही.

यापूर्वीही तशी पक्षाची शहरात फारशी ताकद नव्हतीच. त्यातच नेत्यांचे अहंकार, वास्तवाशी झालेली फारकत, आपापल्या पंटरांचे भले करण्यासाठी केलेली हातघाई आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवसेनेशी युती करुनही त्यांच्याशी योग्य समन्वय ठेवण्यात आलेले अपयश अशा अनेक कारणांमुळे राष्ट्रवादीच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवरही त्याचे परिणाम संभवतात. सबब, सर्वांनीच भानावर येणे गरजेचे.

ताज्या बातम्या

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती...