सिन्नर | वार्ताहर Sinnar
तालुक्यातील चोंढी-सांगवी रस्त्याने दुचाकीवरुन जात असताना सांगवी येथील एका युवकावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवकाच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
सांगवी येथील प्रीतम बाबासाहेब महानुभाव हा युवक आपल्या दुचाकीवरून चोंढी रस्त्याने जात असताना सायंकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रीतमची भितीने गाळण उडाली. बिबट्याने प्रीतमच्या पायाला पकडल्याने बिबट्याचे दात पोटरीत शिरले. यामुळे पायाला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या. बिबट्याच्या हल्ल्यानंतर प्रीतमने प्रसंगावधान राखत दुचाकीचा वेग वाढत तेथून पळ काढला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याला चास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून जखमांवर मलमपट्टी केली. वनविभागाला घटनेची माहिती मिळताच अधिकार्यांनी प्रीतमची भेट घेऊन पुढील आवश्यक इंजेक्शन व अधिक उपचारासाठी त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांनी दिली.
दरम्यान, चोंढी, मेंढी, सांगवी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतकरी, दुचाकीस्वार, विद्यार्थी व रात्रीच्या वेळी ये-जा करणार्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागाने तात्काळ परिसरात पिंजरा लावावा. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावणे, ट्रॅप कॅमेरे बसवणे व जनजागृती करणे यासारख्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे प्रवास करणे टाळावे, शक्यतो समूहाने प्रवास करावा, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वनविभाग व स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.




