नाशिक । शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेऊन लवचिकतेच्या बाबतीत कहर केला. अमिबालाही आपला आकार बदलण्यास जेवढा वेळ लागणार नाही, तेवढ्या वेळात भाजप आपल्या भूमिका, धोरण वा तत्वही बदलू शकतो, हेच गेल्या काही महिन्यातील त्यांच्या आयारामांविषयीच्या दृष्टिकोनातून जाणवते आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या दोघा माजी अध्यक्षांच्या बातम्यांनी चालू आठवडा चर्चेत राहिला. तशी जिल्हा बँक सतत चर्चेत रहात आली आहेच. परंतु सध्या बँकेचे भविष्यात काय होणार अशी शंका उपस्थित झालेली असतानाच या दोघा माजी अध्यक्षांच्या बातम्यांनी पृथ्वी गोल असल्याचा सिध्दांत अधोरेखित केला आहे. झाले असे की, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते व जिल्हा बँकेच्याच एका प्रकरणात सध्या जामिनावर असलेले अद्वय हिरे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर राष्ट्रवादीत असलेले पण कायम भाजपच्या वळचणीला राहून त्यांना स्थानिक राजकारणात मदत होईल असे पाहणारे परवेझ कोकणी यांच्यावर बँकेत नोकरीला लावून देतो असे सांगून पंधरा लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या दोन्ही घटनांमध्ये जिल्हा बँक एवढाच सामायिक धागा नाही. हे दोघेही बँकेचे अध्यक्ष होते हा दुसरा तर दोघांच्याही काळात बँकेत काही गैरप्रकार झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हा तिसरा समान धागा. दोघेही सध्या भाजपमध्ये आश्रयाला असणे हा देखील एक धागा जोडता येईल. अद्वय यांचे बंधू व जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले अपूर्व हिरे यांनीही अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्यावरही मध्यंतरी संस्थेत नोकरीला लावण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप होऊन गुन्हा दाखल झाला आहे. अद्वय यांच्यावर रेणुका सूत गिरणीला दिलेल्या कर्जाच्या गैरवापरासंदर्भात यापूर्वीच गुन्हा दाखल असून ते तर कारागृहाची हवाही खाऊन आले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढविणार्या अद्वय हिरेंमागे नंतर जे शुलकाष्ठ लागले त्या मागे मंत्री दादा भुसे असल्याचे आक्षेप जरुर घेतले गेले, पण त्यामुळे हिरेंवरील आरोपांचे गांभीर्य कमी होत नाही. अनेक महिने जामीनही न झाल्याने व नंतर त्यांच्या संस्थाही चौकशीच्या फेर्यात अडकल्याने सुरुवातीला अपूर्व तर नंतर दस्तुरखुद्द अद्वय असे दोन्ही हिरे भाजपच्या कमलदलात सुखरुप पोहोचले. दोघांच्याही भाजप प्रवेशाचे हे तात्कालिक कारण असले तरी गेल्या पाच-दहा वर्षात त्यांनी अनेक पक्षांचे प्रवास केले. अद्वय हे तर भाजपमध्येही राहून आलेले होते. शिंदेंच्या शिवसेनेने भाजपशी म्होतूर बांधल्यानंतर दादा भुसे यांचा सरकारमधील दरारा वाढला आणि त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या हिर्यांनाही चांगल्या कोंदणाची गरज भासू लागली.
साहजिकच मग अद्वय यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाची निवड केली तर बंधू अपूर्व यांनी राष्ट्रवादी अजित पवारांशी जवळीक साधली. अलिकडे त्यांचे ग्रह फिरलेले दिसतात. दादा भुसे नामक ग्रह वक्री झाल्याने त्यांच्यावर सारखी गंडांतरे येत आहेत. हल्ली राजकारणात अशी काही संकटं आली की प्रत्येकाला भाजपच्या वॉशिंग मशीनची आठवण होते. हिरेंच्या बाबतही तसेच झाले. चुकीच्या वेळी चुकीचा पक्ष निवडल्याबद्दल स्वतःलाच दोष देतानाच त्यांनी मग या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी भाजपच्या वॉशिंग मशीनची निवड केली. तोपर्यंत दोघाही हिरेंना जामीन झाले होते. अद्वय हिरे तर कारागृहातूनही बाहेर आलेले असल्याने व जोपर्यंत न्यायालयात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत संबंधीताला आरोपी म्हणणे योग्य नाही असे संतवचन साक्षात चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानेच नाशिकमुक्कामीच काढलेले असल्याने हिरेंना सामावून घेणे त्यांना जड गेले नाही. अर्थात सध्या भाजपला काहीच जड जात नाही. त्यांच्या दृष्टीने सगळ्याच प्रश्नपत्रिका सोप्याच असतात. सगळीकडेच पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचा त्यांना आता छंद जडला आहे. त्यामुळेच त्यांनी सवयीप्रमाणे मित्रपक्षांनाच धक्के द्यायला सुरुवात केली.
हिरेंचे प्रवेश म्हणजे मालेगावात शिंदेंचे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या साम्राज्याला धडका देण्यासाठी रसद गोळा करण्याचा प्रयत्न दिसतो. भुसे व हिरे यांच्यातून विस्तवही जात नसताना व भुसेंनी मालेगावातील हिरेंचे अस्तित्वच इतिहासजमा केलेले असताना त्यांच्या जवळपास सगळ्याच विरोधकांना पक्षात घेऊन भाजपने भविष्यातील राजकीय मांडणी करणे चालविले आहे. त्यामुळेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक व माजी मंत्री डॉ. बळीराम हिरेंचे चिरंजीव प्रसाद, माजी आमदार अपूर्व हिरे यांना पक्षात घेतानाच आता भुसेंविरोधात विधानसभेत लढलेले अद्वय हिरे यांच्याबरोबरच बंडुकाका बच्छाव यांनाही प्रवेश दिला जात आहे. बंडुकाका हे एकेकाळी भुसेंचे कट्टर सहकारी होते. नंतर त्यांच्यात मतभेद झाल्यावर बच्छावांनी बळीराजा बारा बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरु केले होते. अशारीतीने भुसेंच्या सर्वच विरोधकांना गोळा करुन भाजपने आपले इऱादे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अद्वय हिरे यांनी लागलीच राणाभीमदेवी थाटात स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक जागा जिंकून देण्याची घोषणा केली. यामुळे अद्वय हिरेंवरील गुन्ह्यांचे किटाळ दूर होते का ते पहायचे. कारण अपूर्व हिरेंनाही पक्षात येताच आलेल्या काही संकटांमध्ये भाजपने वार्यावर सोडले होते.
आता दोघेही बंधू व तिसरे प्रसाद बापूही भाजपमध्ये आल्याने सगळ्यांचेच चांगभले होते की निवडक न्याय लावला जातो ते काळाच्या ओघात कळेलच.
अद्वय हिरे यांच्यावर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचे अत्यंत गंभीर आरोप असतांना व त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागलेले असताना भाजपने त्यांना पक्षात घेऊन मोठाच जुगार खेळला आहे. तो दोघांनाही लागू राहील. कारण भुसे हे कोणत्याही परिस्थितीत आपला हेका सोडणार नाहीत. अशा परिस्थितीत हिरेंना मदत करतानाच त्यांना जर राजकीय बळ देण्याचीही भूमिका भाजपने घेतली तर महायुतीत मिठाचा खडा पडू शकेल. जो सध्या आहेच, पण अशा घटनांनी त्यातील खारटपणा वाढेल, हे मात्र निश्चित. याचदरम्यान जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष परवेझ कोकणी यांच्यावरही गुन्हा दाखल होणे ही घटना लक्षवेधी आहे. कारण, आदल्याच दिवशी या महाशयांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवार निवडीत मोठी कळीची भूमिका बजावली होती. यापूर्वीही त्यांनी वेळोवेळी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतलेली आहेच. काही वर्षांपूर्वी तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकला आल्यावर पक्षाच्या नेत्यांकडे जाण्याऐवजी याच कोकणींच्या निवासस्थानी बडा खान्याचा आस्वाद घेतला होता.
अर्थात तेव्हा त्याचे कौतुकही झाले होते. कारण तीर्थक्षेत्री येऊन मुस्लीम बांधवाकडे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी एकात्मतेचे उदाहरण घालून दिले होते. परंतु तेव्हाही याच कोकणींवर जिल्हा बँकेतील काही गैरव्यवहारांचा ठपका होता. तो आजही आहेच. नोकरभरती, तिजोरी व सीसीटीव्ही खरेदी अशा काही निर्णयामुळे तत्कालीन संचालकांवर सहकार कायदा कलम ८८ अन्वये चौकशी होऊन संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय विधानसभेतच झाला होता. बँकेतील संचालकांच्या चौकशीनंतर वसुलीचा निर्णय झालेल्यांमध्ये हे महाशय देखील आहेत. कोकणी एवढे हुशार आहेत की त्यांनी आपले राजकीय गुरु माणिकराव कोकाटे यांनाच दीक्षा देण्याचा प्रताप तेव्हा केला होता. त्यामुळे कोकणींना अध्यक्षपद देण्यासाठी कोकाटे विरोधकांनी तेव्हा मदत केली होती.
तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांची भूमिका तेव्हाही मोलाची ठरली होती आणि परवा त्र्यंबकेश्वरच्या उमेदवारी वाटपावेळीही सानपांनी याच कोकणींची साथ घेतली. कोकणी आर्थिकदृष्ट्या सधन आहेत. त्यांना खरे तर भलतेसलते उद्योग करण्याची तशीही काही गरज नाही. परंतु जिल्हा बँकेत गेल्यानंतर त्यांनाही तेथील पाणी लागले. बनावट नोकरभऱतीद्वारे तरुणाकडून पंधरा लाख रुपये उकळल्याचा आता त्यांच्यावर आरोप झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाशक्तीचा माणूस व त्यातही निवडणुकीचा काळ असल्याने त्यांच्यावर या प्रकरणात कितपत तातडीने कारवाई होते ते दिसेलच. परंतु अशा प्रकरणात आणखीही काही फसवलेले लोक पुढे येण्याची शयता असताना कोकणींना मदत करणे, भाजपला महागात पडू शकते.
कोकणींवर गुन्हा दाखल झाल्याने भाजपला मदत करुनही हे चंदन का लावले असा समज काहींचा होऊ शकतो. परंतु त्यातही भाजपचा नक्कीच काही विचार असू शकेल. अर्थात, गेल्या काही महिन्यात गावावरुन ओवाळून टाकण्याच्या लायकीच्या अनेकांना भाजपने पक्षात घेऊन पावन केलेले आहेच, त्यामुळे हिरे वा कोकणी यांच्याबद्दल ते आणखी काही वेगळी भूमिका घेण्याची सुतराम शयता नाही. सध्या पक्षाला कोणाचा, किती फायदा होतो, यावर गिरीश महाजनादी नेत्यांची गणिते अवलंबून असतात. त्यामुळे आज जात्यात असलेली काही मंडळी उद्या पुन्हा सुपातून हातात आली तरी आश्चर्य वाटू नये. महाजन हे संकटमोचक म्हणून प्रसिध्द आहेतच, परंतु आजपर्यंत ते भाजपचे किंवा अगदीच स्पष्ट सांगायचे तर देवेंद्र फडणवीसांचे संकटमोचक म्हणून वावरले, आता मात्र ते पक्षात येणार्यांचे तारणहार म्हणून नावारुपास येऊ लागले आहेत. भाजपमधील हा बदल लक्षणीय आहे. सध्या सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेऊन लवचिकतेच्या बाबतीत कहर केला, अमिबालाही आपला आकार बदलण्यास जेवढा वेळ लागणार नाही, तेवढ्या वेळात भाजप आपल्या भूमिका, धोरण वा तत्वही बदलू शकतो, हेच गेल्या काही महिन्यातील त्यांच्या आयारामांविषयीच्या दृष्टिकोनातून जाणवते आहे. ‘कालाय तस्मै नम:’




