नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारूढ महायुतीचा दणदणीत विजय झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु एकेका नगरपरिषदेचा विचार केल्यास काही ठिकाणी नगराध्यक्ष एका पक्षाचा तर खाली बहुमत भलत्याच पक्षाकडे अशी नाजूक स्थिती निर्माण झाली आहे. म्हणायला सगळेच महायुतीचे घटक पक्ष आहेत; परंतु निवडणुकीत या पक्षांनी ज्या पद्धतीने एकमेकांवर प्रहार केले आहेत, त्याच्या जखमा लागलीच भरून येतील का, हा लाखमोलाचा सवाल आहे. सटाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने इतिहास घडविला असला तरी तेथे चोवीसपैकी पंधरा नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत. शिंदेंना केवळ चार जागा हाती लागल्या आहेत. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाशी शिंदेंच्या कारभार्यांनी जमवून घेतले नाही तर येथे सत्तासंघर्षाचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकेल. अशीच काहीशी गत भगूरमध्येही झाली आहे.
राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद जिंकून क्रांती केली असली तरी त्यांचे केवळ तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. भले येथे शिवेसेनेविरोधात इतर सर्व पक्षांची आघाडी असली तरी शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक विजयी झाले आहेत. उबाठाला दोन तर भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत. सत्तारूढ आघाडीला सर्वांशी जमवून घेत कारभार करावा लागेल. येवल्यातही राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेत बाजी मारली खरी; पण शिवसेनेनेही दहा जागांवर विजय मिळविल्याने सत्तासमतोलात त्यांची कळीची भूमिका राहील. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाची दुसरी कसोटी ही सत्ता सांभाळताना लागू शकेल. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेने नगराध्यक्षपद पटकावून भाजपला धोबीपछाड दिला. पण तेथे राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. साहजिकच कोणा एकाची मनमानी तेथे चालणार नाही. सत्ता सांभाळताना शिंदेंच्या कारभार्यांना येथेही तारेवरची कसरत करावी लागू शकते. हीच गत इगतपुरीची. शिवसेनेने नगराध्यक्षपद मिळविले खरे; पण एकवीस जागांपैकी केवळ पाच नगरसेवक विजयी झाले आहेत. येथेदेखील तब्बल तेरा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविल्याने शिवसेनेला त्यांच्या कलानेच कारभार करावा लागेल.
नांदगाव व मनमाड येथेच फक्त शिवसेनेला निर्विवाद यश मिळाले आहे. अर्थात, हे सारे श्रेय आमदार सुहास कांदे यांचे. नांदगावमध्ये नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व तर मनमाडमध्ये एकवीस जागा जिंकून शिवसेनेने इतर पक्षांना जवळही फिरकू दिलेले नाही. पिंपळगाव बसवंतलादेखील इतिहास जरूर घडला, मात्र तेथेही भाजपच्या नगराध्यक्षाला कारभार करताना शिवसेनेला गृहीत धरून चालणार नाही. सर्वाधिक दहा जागा जिंकून शिवसेनेने तेथे शंभर टक्के यश मिळविलेले असल्याने सत्तेतील भागीदारीत अधिक वाटा मागण्याची शयता नाकारता येत नाही.
या विजयामुळे भाजपचे युवा नेते सतीश मोरे यांच्या नेतृत्वाचा पैस कैकपटीने वाढला असल्याने त्यांच्याविषयीच्या अपेक्षाही कमालीच्या वाढल्या आहेत. भविष्यात तालुयाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आलेली असल्याने मोरेंना सावधपणे वाटचाल करावी लागेल. ओझरमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी आपला प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध करून नगराध्यक्षासह सोळा नगरसेवकही निवडून आणले. त्यांचे बंधू माजी आमदार अनिल कदम यांची गावातील राजकारणाकडे पाहण्याची र्हस्व दृष्टी मारक ठरली. यतीन कदम यांनी निर्भेळ यश संपादन केल्याने त्यांनादेखील तालुयाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली आहे.
यापूर्वी त्यांनी एकदा मनसेत असताना विधानसभेसाठी प्रयत्न करून पाहिला होता. त्यानंतर मात्र त्यांनी स्थानिक राजकारणात अधिक लक्ष घातल्याने त्याचे फळ मिळाले. भगूरमधील राष्ट्रवादीच्या यशात देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. प्रेरणा बलकवडे यांची प्रतिमा तसेच सामाजिक कार्यातील सक्रियता महत्त्वाची आहेच, पण ज्या पद्धतीने गेले वर्षभर आमदार अहिरेंनी शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्याशी थेट पंगा घेतला त्याला भगूरकरांनी दिलेली ही पावती आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची आणि सत्तारूढ महायुतीतीलच दोन पक्षांमध्ये कमालीच्या त्वेषाने लढली गेलेली ही कदाचित एकमेव निवडणूक असावी. करंजकर यांच्या सत्तेविषयी प्रस्थापितविरोधाची भावना असली तरी तिला आपल्याकडे वळविण्यात अहिरेंनी कळीची भूमिका निभावली. भगूरमध्ये शिवसेना व भाजपचे कधीच जमले नाही. शिवसेना तेथे सुरुवातीपासूनच ताकदवान होती.
प्रेरणा बलकवडे यांचे सासरे गोरक्षनाथ बलकवडे यांची सत्ता उलथविल्यानंतर करंजकरांना गावाने अक्षरश: डोयावर घेतले होते. काळाचा महिमा पाहा, आज त्याच बलकवडे परिवारातील महिलेने त्या पराभवाची परतफेड केली. करंजकर यांनी आमदार अहिरेंविषयी केलेल्या वक्तव्याचा त्यांना फटका बसला. आमदार अहिरेंनीही अत्यंत आक्रमक शैलीत करंजकरांचा समाचार घेऊन सहानुभूती मिळविली. अशीच खणखणीत कामगिरी त्र्यंबक व इगतपुरी येथे आमदार हिरामण खोसकर यांनी करून दाखविली. साधारणपणे आजपर्यंत त्यांनी कधीच या शहरांच्या राजकारणात लक्ष घातले नव्हते. यंदा मात्र त्यांना त्यात यश आले. भले नगराध्यक्षपदे मिळाली नसतील, पण दोन्हीकडील सत्तेच्या चाव्या मात्र त्यांच्याच हाती राहतील.
लोकसभेतील पराभवापासून स्वपक्षातही अडगळीत गेलेले माजी खासदार हेमंत गोडसे यांचे राजकीय कौशल्य त्र्यंबक व इगतपुरीत प्रकर्षाने दिसले. त्यांचे सख्खे शेजारी विजय करंजकर पराभूत होत असताना त्यांनी दूरवरील या दोन पालिकांमध्ये पक्षाची सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा उचलला. मध्यंतरी त्यांच्याविषयी पक्षातही उद्भवलेले संशयाचे वातावरण या कार्यकर्तृत्वाने दूर होईल, असे वाटते. एकूण काय, तर या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकारणात काही नव्या नेतृत्वाचा उदय झाला असून त्यांच्या कामगिरीवर पुढील विधानसभेची छाया राहील हे निश्चित.




