नवी दिल्ली | New Delhi
आज सकाळपासून लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) सहाव्या टप्प्यातील सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. यामध्ये दिल्लीतील (Delhi) सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान पार पडत असून आतापर्यंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रातून बाहेर पडताना दोघांनी सेल्फीही घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi) त्यांचे पती राजीव वड्रा आणि मुले रेहान व मिराया वड्रा यांनी दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यावेळी प्रियंका गांधींच्या मुलांनी पहिल्यांदाचा मतदानाचा हक्क बजावला. तसेच ‘ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी मतदान करावे”, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
त्याचबरोबर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी विकासाची कामे करणाऱ्या योग्य उमेदवारांनाच आपले अनमोल मत द्या, असे आवाहन मतदारांना केले. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनीही दिल्लीतील ओल्ड राजिंदर नगर येथील स्वामी दयानंद सर्वोदय कन्या विद्यालयातून जाऊन मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिल्लीतील अटल आदर्श विद्यालयात जाऊन मतदान केले.
दरम्यान, सहाव्या टप्प्यात होणाऱ्या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ कोटी महिला मतदारांचा समोवश आहे. निवडणूक आयोगाने १.१४ लाख मतदान केंद्रांवर सुमारे ११.४० लाख मतदान अधिकारी तैनात केले आहेत. तर सकाळी ११ वाजेपर्यंत देशात सरासरी २५.७६ टक्के मतदान झाले आहे. बिहार २३.६७ टक्के, हरियाणा २२. ०९ टक्के, जम्मू आणि काश्मीर २३. ११ टक्के, झारखंड २७.८० टक्के, नवी दिल्ली २१.६९टक्के, ओडिसा २१.३० टक्के, उत्तरप्रदेश २७. ०६ टक्के, पश्चिम बंगाल ३६.८८ टक्के मतदान झाले आहे. तर सकाळी ९ वाजेपर्यंत देशात १०. ८२ टक्के मतदान झाले होते. यामध्ये बिहार ९.६६ टक्के, हरियाणा ८. ३१ टक्के,जम्मू आणि काश्मीर ८. ८९ टक्के, झारखंड ११.७४ टक्के, नवी दिल्ली ८.९४ टक्के, ओडिसा ७.४३ टक्के उत्तर प्रदेश- १२. ३३ टक्के, पश्चिम बंगाल १६.५४ टक्के मतदान झाले होते.