नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभेतील विरोधीपक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे बऱ्याच काळापासून देशात मत चोरी होत असल्याचा आरोप करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर पुरावे सादर करत मत चोरी होत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींकडून सतत निवडणूक आयोगावर हल्लाबोल होत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ २७२ दिग्गज मैदानात उतरले आहेत.
निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ हे पत्र लिहिण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाला बदनाम करत असल्याचा आरोप या 272 दिग्गजांनी लावला आहे. या पत्रात लोक सभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी हे घटनात्मक संस्थांना कमी लेखत आहेत. विशेष करून ते निवडणूक आयोगला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला.
विशेष म्हणजे या २७२ प्रतिष्ठित नागरिकांमध्ये १६ न्यायाधीश, १२३ निवृत्त प्रशासकीय अधिकारी, १४ माजी राजदूत आणि सशस्त्र दलाचे १३३ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पत्राचे शिर्षक हे राष्ट्रीय घटनात्मक संस्थांवर हल्ला असे आहे. हे पत्र १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पाठवण्यात आले आहे.
पत्रात नेमकं काय म्हंटले आहे?
या खुल्या पत्रात निवडणूक आयोगाविरोधातील कथित आरोपांची निंदा करण्यात आली आहे. आम्ही समाजातील ज्येष्ठ नागरिक या बाबतीत चिंता व्यक्त करतो की, भारतीय लोकशाहीवर बळाचा उपयोग नाही तर, तिच्या अनेक आधारभूत संस्थांविरोधात घातक वक्तव्य करून हल्ला करण्यात येत आहे. काही नेते हे नाटक वठवत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत असे या पत्रात म्हटले आहे.
एवढंच नाही तर या पत्रात विरोधी पक्षाचे नेते हे सशस्त्र दलांवर, न्यायव्यवस्थेवर, संसदेवर आणि घटनात्मक संस्थांवर हल्ले करत आहेत. विरोधक हे पद्धतशीरपणे आणि कट रचून निवडणूक आयोगावर हल्ले करत आहेत. असे म्हंटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




