पाथर्डी । तालुका प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाचे तब्बल तीस हजार रुपये चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी प्रवासादरम्यान झाली असून, या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरुवारी (२३ तारखेला) अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी प्रदीप पालवे (वय ३०, रा. आनंदनगर, पाथर्डी) यांनी या घटनेसंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्या मुंबईहून पाथर्डीकडे येणाऱ्या एस.टी. बसने प्रवास करत होत्या. मेहकरी फाटा येथून त्यांना पाथर्डीकडे जायचे असल्याने त्यांनी बस पकडली. बसमध्ये त्या डाव्या बाजूच्या दुसऱ्या आसनावर बसल्या होत्या.
सीटवर त्यांच्या शेजारी डाव्या बाजूस त्यांचे नातेवाईक तर उजव्या बाजूस एक अज्ञात महिला बसलेली होती. पालवे यांनी बचतगटातून घेतलेले ३० हजार रुपये रोख रक्कम आपल्या पर्समध्ये ठेवले होते. प्रवासादरम्यान, उजव्या बाजूला बसलेल्या अज्ञात महिलेने पालवे यांना “तुम्हाला कोठे जायचे आहे?” अशी विचारणा केली. त्यावर पालवे यांनी “तिसगावला जायचे आहे,” असे उत्तर दिले.
गुरुवार, २३ तारखेला दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास बस तिसगावच्या अलीकडील चौकात थांबली. याच वेळी ती अज्ञात महिला बसमधून खाली उतरून निघून गेली. त्यानंतर लगेचच रोहिणी पालवे यांनी आपली पर्स तपासली असता, त्यांना पर्समधील ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. अनोळखी महिलेने विचारपूस करण्याच्या बहाण्याने त्यांचे लक्ष विचलित केले आणि पर्समधून पैसे चोरले असावेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रवासादरम्यान झालेल्या या चोरीमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहिणी पालवे यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बसमधील इतर प्रवाशांकडून आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. एस.टी. बसमध्ये मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





