
नाशिक । प्रतिनिधी Nashik
सिंहस्थ महाकुंभाच्या विकास कामांवर खर्च होणारा पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा कुठे आणि कसा खर्च होत आहे, हे विचारण्याचा अधिकार जनता आणि विरोधी पक्षांना आहे. हे पैसे मुख्यमंत्र्यांच्या घरचे नाहीत. सिंहस्थाची कामे करताना सत्ताधाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेतलेच पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भाजपला या खर्चाचा जाब विचारणारच, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
काँग्रेस पक्षाचे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये निवासी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या निमित्ताने चव्हाण सोमवारी (दि. ३१) नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोधी पक्षांकडून बदनाम केले जात असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप चव्हाण यांनी फेटाळून लावला.
विरोधी पक्ष म्हणून जनतेशी संबंधित प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी वापरला जाणारा पैसा सत्ताधाऱ्यांच्या घरातील नसून जनतेचा आहे. त्यामुळे तो कुठे-कुठे खर्च होत आहे, याचा हिशोब मागण्याचा जनतेला पूर्ण अधिकार आहे. नाशिकसाठी मिळणाऱ्या निधीतून नाशिकचा विकास झालाच पाहिजे. मात्र, हा निधी कशाप्रकारे खर्च केला जात आहे, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, असे चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे-पाटील यांच्यात सुरुवातीच्या मोर्चाच्या वेळी झालेल्या करार व आश्वासनांमुळे आंदोलन थांबले होते. मात्र, नेमका काय करार झाला होता, याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे जरांगे-पाटील यांना पुन्हा उपोषण करावे लागत असेल, तर सत्ताधाऱ्यांकडून समाजाची दिशाभूल करण्यात आली की काय, अशी शंका निर्माण होते, असे चव्हाण यांनी नमूद केले.
‘समृद्धीवरील घटनांना सत्ताधारी जबाबदार’
समृद्धी महामार्गावरील दरोडे, चोरी आणि लुटीच्या घटनांबाबत चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. रस्ते, पूल, महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे झालेच पाहिजेत. समृद्धी महामार्गासाठी किती पैसा खर्च झाला, याची सध्या माहिती नाही. मात्र, सत्ता हातात आल्यानंतर या कामाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
एक्स्प्रेस-वे आणि महामार्गांवर ठिकठिकाणी जनसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, या सुविधा उभारण्याची कामे कोणाला द्यायची, यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच वाद सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या चोरी, लुटी आणि दरोड्यांच्या घटनांना सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप करत चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.




