भुसावळ – Bhusawal
जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आतापर्यंत पाच हजार ७०० हुन अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे.
मागील महिन्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खा.रक्षाताई खडसे यांनी जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार २० जून रोजी केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉ.अरविंद अलोने (वरिष्ठ प्रादेशिक संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणे), सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. एस. डी.खापर्डे यांनी जिल्ह्यात दौरा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला होता व गंभीर रुग्णांना आवश्यक व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त आहे असे निरीक्षण नोंदवले होते.
खा.रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभा क्षेत्रातील कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश मिळून पंतप्रधान सहायता निधीमधून रावेर लोकसभा क्षेत्रातील भुसावळ येथे १०, चोपडा९, जामनेर १०, मुक्ताईनगर १० असे ३९ व्हेंटिलेटर मिळाले असल्याने आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली आहे.