Wednesday, April 2, 2025
Homeनगर5 लाखांचा सरसकट मोफत आरोग्य विमा मंत्रालयात अडकला

5 लाखांचा सरसकट मोफत आरोग्य विमा मंत्रालयात अडकला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्रातील सर्व बारा कोटी जनतेसाठी लाभदायक ठरणारी पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना 10 महिन्यांपासून मंत्रालयातील दप्तर दिरंगाईत अडकली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 5 लाख रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती करणार्‍या या मोफत आरोग्य विम्याच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व साऊ महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

28 जुलै 2023 रोजी या योजनेचा शासन निर्णय जारी झाला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात 2 जुलै 2012 पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाली. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा कुटूंबांचा म्हणजेच दारिद्रयरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्नपूर्णा व दारिद्रयरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश होता. यासाठीचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकार भरत होते. त्यामुळे रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर 2014 मध्ये या योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून यासाठी मंत्रालयात विशेष कक्षही सुरू करण्यात आला. दरम्यान 23 सप्टेंबर 2018 पासून देशभरात केंद्र सरकारची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्याच्या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी सुरू झाली. केंद्राच्या योजनेत 5 लाखांचा, तर राज्याच्या योजनेत दीड लाख रुपये प्रति कुटूंंब, प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षण लाभ देय करण्यात आला.

28 जुलै 2023 ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्य अशा दोन्ही योजनांची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रातील रहिवासी असणार्‍या सरसकट सर्व 12 कोटी जनतेला 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण लागू केले. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंब व महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना सुधारीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. विम्याचे पैसे महाराष्ट्र सरकार संबंधित विमा कंपनीस देणार असल्याने 12 कोटी महाराष्ट्रवासियांना योजनेच्या यादीतील रुग्णालयांमधून 5 लाख रुपये खर्चापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री, मंत्री आपल्या भाषणांमधून या योजनेचा गवगवा करत असले तरी या शासन निर्णयास 10 महिने होऊन गेल्यानंतरही योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

सध्या यांना मिळते केंद्राचे कार्ड
सध्या 2011 च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय सर्वेक्षणाच्या यादीत नाव असलेल्यांनाच केंद्र सरकारच्या योजनेचे कार्ड ऑनलाईन मिळत आहे. त्यासाठीही शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक व आधार क्रमांक गरजेचा आहे. अनेकांकडे शिधापत्रिकेचा बारा अंकी ऑनलाईन क्रमांक नसल्याने त्यांना हे कार्ड मिळत नाही. त्यामुळे शिधापत्रिके ऐवजी आधार क्रमांक व मतदार ओळखपत्राद्वारे रहिवासी असल्याची खात्री करून नव्या योजनेचे कार्ड तातडीने वाटप करण्याची मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....