श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिर्डी लोकसभा मतदार संघात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर काल चौथ्या टप्प्यात प्रत्यक्ष मतदान प्रक्रीया पार पडली. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिर्डी लोकसभेसाठी शांततेत मतदान पार पडले. मतदारांनीही उत्स्फूर्तपणे सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. नवमतदार, युवक, युवती, वयोवृद्ध, महिला आणि पुरुष या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच शहरात तृतीय पंथीयांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात 3 लाख 2 हजार 133 मतदारांपैकी 1 लाख 81 हयार 286 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी 60 टक्के मतदान झाले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातील नेतेमंडळीकडून मतदान घडवून आणण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाही. तरी मतदार स्वयंस्फुर्तीने मतदान करताना आजच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे तसेच वंचितच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रुपवते अशी तिरंगी लढत पहायला मिळाली. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. सुरवातीच्या दोन तासात 7.31 टक्के मतदान झाले. बहुतांशी मतदान केंद्रांवर सकाळी 10 वाजल्यापासून मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. त्यामुळे सकाळी 11 वाजता 20.57 टक्के मतदान झाले होते.
दुपारी 3 वाजेपर्यंत 46.88 टक्के मतदान झाले होते. तालुक्यात बर्याच ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरु असल्याने अंतीम आकडेवारी येण्यास उशिर लागला, तरीपण तालुक्यात सरासरी 60 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांनी दिली. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारांचा मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी सकाळच्या सत्रात मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र दिसत होते. तालुक्यातील टाकळीभान, खानापूर, माळवाडगाव, महांकाळवाडगाव, गोदा पट्ट्यातील नाऊर, रामपूर, मातुलठाण, सरला, गोवर्धनपूर, दत्तनगर, खोकर, भोकर, पढेगाव, मातापूर, मालुंजा, खंडाळा, कारेगाव, कमालपूर, खैरी निमगाव, गोंडेगाव, बेलापूर यांसह ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावरील बुथवर मतदार आपली नावे शोधण्यासाठी गर्दी करताना दिसून येत होते.
अनेक ठिकाणी मतदार अधिक आणि एकच बूथ असल्यामुळे मतदान करण्यासाठी गर्दी झाली होती. काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसाठी पंखे बसवलेले नव्हते. गोंधवणी येथे मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. नंतर अधिकार्यांनी यंत्र बदलले पुन्हा मतदान प्रक्रीया सुरळीत झाली. उन्हाचा चटका जाणवत असल्याने अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याची पाणीची व्यवस्था करण्यात आली होती. स्तनदा मातांसाठी पाळणा घरची व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच वयोवृद्ध मतदारांना आरोग्यसेवा पुरवण्याच्या दृष्टीनेही तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदारांना अडचण येऊ नये म्हणून मतदार सहाय्यता केंद्रही ठिकठिकाणी स्थापन करण्यात आले होते. तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मतदान प्रक्रीया एकूणच तालुक्यात शांततेच्या वातावरणात पार पडली.