संगमनेर | प्रतिनिधी
शनिवारपासून (दि. ७ सप्टेंबर) सुरू होणारा गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण-उत्सव उत्साहात साजरे व्हावे, याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व गालबोट लागू नये यादृष्टीने पोलीस प्रशासनाकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ खाली रेकॉर्डवरील ६२ व्यक्तींना संगमनेर व अकोले तालुका अर्थात संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
उपविभागातील संगमनेर शहर, संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी पोलीस ठाणे हद्दीतील व्यक्तींना संगमनेर तालुका महसूल सीमेत प्रवेश करण्यास तर अकोले व राजूर पोलीस ठाणे हद्दीतील व्यक्तींना अकोले तालुका महसूल सीमेत प्रवेश करण्यास शनिवार दि. ७ सप्टेंबर दुपारी बारा वाजेपासून ते मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत मनाई करण्यात आलेली आहे. यामध्ये संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील २०, तालुका १०, अकोले १०, राजूर १०, घारगाव ५ आणि आश्वी ७ अशा एकूण ६२ जणांवर सदर कारवाई करण्यात आली आहे. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये ते नमूद महसूल हद्दीमध्ये आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.