मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
महानगरपालिका निवडणुकीसाठी आज २१ प्रभागातील ८३ जागांसाठी अभुतपुर्व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. ५ लाख १७ हजार ६६३ पैकी ३ लाख ४६ हजार ८२९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुमारे ६७ टक्के मतदान नोंदविले गेले.
सायंकाळी साडेपाच वाजेनंतर देखील बहुतांश प्रभागातील मतदान केंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बोगस मतदार संशयावरून अनेक ठिकाणी घडलेले बाचाबाचीचे प्रकार घडले तर केंद्राबाहेर जमत असलेल्या जमावास पोलिसांतर्फे पिटाळले जात होते. किरकोळ वादाचे प्रकार वगळता एकही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळे यंदा अभुतपुर्व ६७ टक्के मतदान नोंदविले जावू शकले. सुरळीत सुरू असलेले ईव्हीएम यंत्र व सशस्त्र पोलिसांचा मतदान केंद्रांवर तैनात कडेकोट बंदोबस्तामुळे संपुर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडल्याने पोलीस-निवडणूक यंत्रणेस दिलासा मिळाला.
दरम्यान, शहरातील ४१ इमारतीतील २६४ मतदान केंद्रांवर देखील यंदा प्रथमच किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच या मतदान केंद्रांवर वरिष्ठ अधिकार्यांनी गस्त घालत लक्ष ठेवले होते. ओळखपत्राशिवाय कुणासही प्रवेश पोलिसांतर्फे दिला जात नव्हता. तसेच केंद्राबाहेर गर्दी जमणार नाही याची सातत्याने दक्षता सशस्त्र पोलिसांतर्फे घेतली जात असल्याने संवेदनशील केंद्रातील मतदान कुठल्याही अप्रिय प्रकार न घडता पार पडले.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर चार वाजेनंतर पश्चिम भागातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगेत वाढ झाली. पुर्व भागात देखील मोठ्या प्रमाणात मतदार घराबाहेर पडल्याने सर्वच केंद्रांवर मतदारांची अभुतपुर्व गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची मुदत संपल्यानंतर पोलिसांतर्फे केंद्रांचे प्रवेशव्दार बंद करण्यात आले. मात्र मतदान केंद्रात मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असल्याने सायंकाळी उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया अनेक केंद्रांवर सुरूच होती.
मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सुमारे ३ लाख ६४ हजार ८२९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.




