Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिन्नर नगरपरिषदेच्या तीन जागांसाठी ६८ टक्के मतदान

सिन्नर नगरपरिषदेच्या तीन जागांसाठी ६८ टक्के मतदान

सिन्नर | वार्ताहर Sinnar

- Advertisement -

सिन्नर नगरपरिषदेतील ३ प्रभागातील ३ जागांसाठी आज (दि.२०) सर्व ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. एकूण १०७२१ पैकी ७३१३ मतदारांनी ६८.२१ टक्के) आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता सर्वच केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

YouTube video player

सर्वच केंद्रांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. प्रभाग १० मध्ये मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. प्रभाग २ मध्ये त्या खालोखाल उत्साह दिसत होता. मात्र, प्रभाग ४ मध्ये मतदान केंद्रांबाहेरील तिनही उमेदवारांच्या बुथवर गर्दी दिसत असली तरी प्रत्यक्षात मतदान खूपच कमी झाले.

सिन्नर नगरपरिषदेतील नगराध्यक्ष व ३० नगरसेवकांसाठी २ डिसेंबरला मतदान प्रकिया पार पडणार होती. मात्र, प्रभाग क्र. २ अ, प्रभाग क्र. ४ अ, प्रभाग क्र. ५ अ व प्रभाग क्र. १० ब या चार जागांवर निवडणूक लढणार्‍या काही उमेदवारांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी निघाल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय आयोगाने या जागांसाठी आज मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.

या जागांसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज माघारीसाठीही मुदत देण्यात आली होती. त्यानूसार प्रभाग ५ अ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दर्शन भालेराव यांनी माघार घेतल्याने उदय गोळेसर यांची बिनविरोध निवड झाली. उरलेल्या तीन जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली.

प्रभाग क्र. २ अ साठी ब. ना. सारडा विद्यालय, प्रभाग क्र. ४ अ साठी महात्मा फुले विद्यालय व प्रभाग क्र. १० ब साठी सरदवाडी रोडवरील संजीवनी शाळेत मतदान घेण्यात आले. २ अ मध्ये शीतल सुनिल कानडी व सविता खंडेराव कानडी, ४ अ मध्ये आशा माणिक जाधव, शोभा राजेंद्र जाधव व संध्या अशोक जाधव, १० ब मध्ये सोमनाथ पंढरीनाथ पावसे, अनिल अशोक सरवार व अक्षय अशोक चकोर यांच्यात लढत झाली.

सिन्नरला बोगस मतदानाचा प्रयत्न
सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान आज (दि. २०) सकाळी बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. शहरातील ब. ना. सारडा विद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी सुमारे ८.३० च्या सुमारास एका तरुणाने दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या प्रतिनिधींनी आणि कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत हाणून पाडण्यात आला. कृष्णा सुनील निचळ (२५) रा. विजयनगर असे आरोपीचे नाव असून तो दुसर्‍या मतदाराच्या नावाचे आधारकार्ड वापरून मतदान करत असल्याचे आढळून आले. संशय आल्यावर मतदान अधिकार्‍यांनी त्याची कागदपत्रे तपासली असता बोगस मतदानाचा प्रयत्न उघड झाला. याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

यानंतर सिन्नर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत निचळ यास ताब्यात घेतले. मतदान केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून निचळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मतदान केंद्र परिसरात कोणताही तणाव किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.

पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग १० मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी करणार्‍यांना वेळोवेळी तंबी दिल्यानंतरही ते तेथून हालत नसल्याने पोलीसांनी अनेकांना काठ्यांचा प्रसाद दिल्यानंतर ही गर्दी कमी झाली. हे दोन प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....