नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रशियाच्या पूर्वेकडील कमचटका बेटाच्या किनाऱ्याजवळ आज सकाळी भूकंपाचा तीव्र झटका जाणवला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, या भूकंपाची तीव्रता ७.४ रिक्टर स्केलवर नोंदवली गेली आहे. समुद्राच्या खोलीत केंद्रबिंदू असलेल्या या धक्क्यांमुळे परिसरातील किनारी भागात लोकांना तीव्र हादरे जाणवले. भुकंपाचा केंद्रबिंदु कमचटका शहरापासून सुमारे १११ किलोमीटर पूर्वेकडे उत्तर प्रशांत महासागरात आहे. पहाटे २.३७ मिनिटांनी झालेल्या या भूकंपामुळे रशियातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
जुलैमध्ये ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप ज्या भागात आला होता आणि ज्यामुळे पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, त्याच भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज झालेल्या भूकंपामुळे कोणत्याही संभाव्य त्सुनामीच्या धोक्यासाठी अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रशांत त्सुनामी चेतावनी केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा परिणाम समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये जास्त होऊ शकतो. प्राथमिक अंदाजानुसार, प्रशांत महासागराच्या जवळ असलेल्या देशांना त्सुनामीचा धोका आहे.
या भुकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे समजले नाही. जुलैमध्ये रशियाच्या कमचटका प्रदेशात ८.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यामुळे पूर्व रशियामध्ये जोरदार हादरा बसला होता. जपान, अमेरिका आणि अनेक पॅसिफिक बेट देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
२०११ साली जपानमध्ये आलेल्या ९.१ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंप होता, ज्यामुळे विनाशकारी त्सुनामी आली होती. कमचटका बेटाजवळ मोठ्या भूकंपांचा इतिहास आहे. १९५२ मध्ये सोव्हिएत काळात या प्रदेशात ९.० रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला होता, जो इतिहासातील सर्वात मोठा भूकंप होता. जुलैमध्ये झालेल्या भूकंपानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी हवाई, अलास्का, कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्यावरील इतर राज्यांना त्सुनामीचा इशारा दिला.
कमचटका हा प्रदेश ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’मध्ये मोडतो, जो ज्वालामुखी उद्रेक आणि भूकंपासाठी ओळखला जातो. इथे लहानमोठे झटके कायम येत असतात. मात्र 7.4 इतक्या तीव्रतेचा भूकंप धोकादायक मानला जात आहे. यामुळे मोठी त्सुनामी येऊ शकते आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





