Tuesday, May 7, 2024
Homeनगरसमाधानकारक पावसामुळे पिंपरी निर्मळ परिसरातील खरीप पिके बहरली

समाधानकारक पावसामुळे पिंपरी निर्मळ परिसरातील खरीप पिके बहरली

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

श्रावण व भाद्रपदमध्ये गेल्या महिनाभरापासून वेळोवेळी झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिंपरी निर्मळ परीसरातील जिरायत भागातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

- Advertisement -

मान्सूनच्या सुरवातीला जिरायत भागातील काही गावांमध्ये यंदा लवकर पाऊस झाला. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकर्‍यांनी कमी जास्त ओलीवर सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी केली.काहींनी कांद्याचे रोप तयार करण्यासाठी महाग बियाणे टाकले. मध्यंतरी चांगला पाऊस असल्याने पिकांची चांगली उगवण झाली. पिकांची वाढही चांगली झाली. जुलै महिन्यात दररोज एखादी सर येऊन जायची. त्यामुळे पिके तग धरून होती. पण जुलैचा शेवटचा आठवडा व ऑगस्टचा पहिला पंधरवडा पूर्ण कोरडा गेल्याने पिके सुकायला लागल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

हलक्या मुरमाड जमिनीतील सोयाबीन, बाजरी, मूग व चारा पिकांना फटका बसला होता. ज्यांच्याकडे थोडेफार पाणी होते त्यांनी तुषार सिंचनाचा आधार घेतला. मात्र बहुसंख्य शेतकर्‍यांच्या विहिरीत पाणी नसल्याने राहाता तालुक्यातील निळवंडे जिरायत टापूतील पिके धोक्यात आली होती. मात्र श्रावण व भाद्रपद महिन्यात उभ्या पिकांना आवश्यक असलेला समाधानकारक पाऊस वेळोवेळी झाल्यामुळे पिकांना जीवदान मिळून ही पिके सिझनच्या अंतिम टप्प्यात आली आहेत. मध्यंतरी पाऊस लांबल्याने काही प्रमाणात सोयाबीन, बाजरी या पिकांना फटका बसणार आहे. उभ्या पिकांचे भागेल एवढा पाऊस झाला असला तरी या पावसाने विहिरींना फायदा होणार नसल्याने शेतकर्‍यांमधून मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

गेल्या वर्षी सोयाबीनला दहा हजारांच्या पुढे भाव मिळाला होता. सध्याही हे दर साडेसात हजारांपर्यंत आहेत. पुढील महिन्यात सोयाबीनची सोंगणी सुरू होवून नवीन आवक सुरू झाल्यावर असेच भाव टिकून राहिल्यास पेट्रोल, डिझेल मजुरीचे वाढलेले भाव या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या