Tuesday, May 7, 2024
Homeनगरहिमालयातील 2 शिखरांवर 10 वर्षांच्या स्वरूप शेलारची यशस्वी चढाई

हिमालयातील 2 शिखरांवर 10 वर्षांच्या स्वरूप शेलारची यशस्वी चढाई

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी राहाता तालुक्यातील वाकडी येथील स्वरूप प्रविण शेलार या बालकाने हिमाचल प्रदेशातील मनाली जवळील पीरप्रांजल पर्वत रांगेतील पतालसु व फ्रेन्डशिप ही दोन्ही हिमाच्छादीत शिखरे सर करत यावर तिरंगा फडकावला.

- Advertisement -

यातील पतलासु शिखर 13,944 तर फ्रेन्डशिप हे तब्बल 17, 346 फूट उंच आहे़ विशेष म्हणजे स्वरूपने याच महिन्यात 5 व 11 ऑक्टोबर रोजी या दोन्ही शिखरांना गवसणी घातली आहे़ एवढ्या कमी वयात एकाच मोहिमेत दोन हिमाच्छादीत शिखरे सर करणारा स्वरूप पहिलाच भारतीय बाल गिर्यारोहक ठरला आहे.

मूळचा तालुक्यातील वाकडी या खेडेगावातील असलेला स्वरूप सध्या वडील प्रविण शेलार यांच्या नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहतो. पोलीस निरीक्षक असलेली व हिमालयातील मिरा पीक सर केलेली आपली आजी द्वारका डोखे यांच्याकडून स्वरूपला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली़ सध्या द्वारका डोखे एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी मनालीत प्रशिक्षण घेत आहेत.

स्वरूपला लहानपणापासूनच निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे बागडायला व डोंगरदर्‍यात चढाई करायला आवडते. त्यामुळे वयाच्या 7 व्या वर्षीच त्याने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करून आपल्या गिर्यारोहणाचा व ध्येयाचा श्रीगणेशा केला. नुकतीच ड्रीम एडव्हेंन्चर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मा. पतालसु, मा. फ्रेंडशिप व मा. शितीधर शिखरांची मोहीम आयोजित करण्यात आली होती़ 16 सदस्यांचा सहभाग असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर औरंगाबादचे रफिक शेख यांनी केले.

ही शिखरे सर करताना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. तरीही रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व सदस्यांच्या प्रोत्साहनामुळेच सर्वात कमी वयात स्वरूपने ही शिखरे सर करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. यासाठी स्वरूपला आयर्न मॅन दशरथ जाधव, व्हिनस वर्ल्ड स्कूलचे डायरेक्टर माधव राऊत, प्राचार्या मृण्मयी वैद्य व पोलीस ब्रह्मदेव मेटे यांचे विशेष सहकार्य मिळाले.

स्वरूपने यापूर्वी रायगड, वासोटा, सिंहगड, कानिफनाथ, रामदारा, नगर मधील कळसूबाई तसेच नाशिकचे पांडवलेणी हे ट्रेक केले आहे. त्याने हिमालयातील ट्रेकिंगसाठी रोज तीन किलोमीटर धावण्याचा व 12 किमी सायकल चालवण्याचा सराव केला. याशिवाय दोरीवरच्या उड्या, प्राणायाम अशी तयारी केली. स्वरूपची आई नीलम ही स्पोर्ट टीचर असल्याने त्याला घरातूनच खेळ व व्यायामाचे बाळकडू मिळाले. पतालसु मोहिमेत त्याला मायग्रेन व ओमेटिंगचा खूप त्रास झाला परंतु मनात ठाम असल्याने व अन्य सदस्यांच्या प्रेरणेने त्याने शिखर सर करून आपला आत्मविश्वास सार्थ करून दाखवला. त्यानंतर पुढील शिखर फ्रेंडशिप पीक अधिक कठीण व उंच असूनही त्याने सर केले. फ्रेंडशिप शिखर मोहिमेत शेवटचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रक्त गोठवणार्‍या थंडीत रात्री बारा वाजता चढाई सुरू झाली. सकाळी 7:40 वाजता सर करून स्वरूपने भारताचा तिरंगा मानाने फडकवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या