Friday, May 3, 2024
Homeनगरअखेर 7 दिवसांनी उपोषण सुटले

अखेर 7 दिवसांनी उपोषण सुटले

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीकरांच्या विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते यांचे गेली सात दिवस आमरण उपोषण सुरू होते. परंतु काल दि. 24 रोजी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधत संस्थानचे साई प्रसादालय उघडण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर काल उपोषण सोडण्यात आले.

- Advertisement -

शिर्डी शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर कोते दि. 18 नोव्हेंबरपासून शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्तांच्या विविध मागण्यांसाठी द्वारकामाई समोरच्या प्रांगणात उपोषण सुरू केले होते. साईप्रसादालय, लाडू प्रसाद, प्रवेशद्वार क्रमांक तीन तसेच द्वारकामाई गेट, द्वारावती गार्डन, आणि शहरातील रस्त्यावर लावलेले बॅरिकेटस काढण्यात यावेत आदी मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी श्री. कोते आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणादरम्यान कोते यांच्या द्वारावती गार्डन, ऑफलाईन पासेस, बॅरिकेट्स या तीन मागण्या साई संस्थानने मान्य केल्या होत्या.

उर्वरित तीन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत श्री. कोते यांनी उपोषण सुरुच ठेवले होते. उर्वरित मागण्यांपैकी प्रसादालय पन्नास टक्के आसन व्यवस्था ठेवून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच बॅरिकेटस काढून टाकण्यात आल्याचे म्हटले आहे. द्वारकामाई मंदिराचे गेट उघडण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला असून अन्यथा पुन्हा उपोषण करण्यात येईल, असे दिगंबर कोते यांनी सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्ष तथा साईसंस्थानचे विश्वस्त शिवाजी गोंदकर, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी, प्रांताधिकारी कार्यालयाचे श्री. गुळवे, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, नगरसेवक मंगेश त्रिभुवन पत्रकार जितेंद्र लोकचंदानी, दिगंबर कोते यांचे कुटुंबातील सदस्यांंसह अनेक नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या