Tuesday, May 7, 2024
Homeनगरशेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत पुणतांबेकरांचा पुन्हा एल्गार

शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत पुणतांबेकरांचा पुन्हा एल्गार

पुणतांबा |वार्ताहर|Puntamba

शेतकरी संपाचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणतांबा गावातील शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला आहे. आंदोलनाची दिशा निश्चीत करण्यासाठी येत्या 23 मे रोजी पुणतांब्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असून त्यात पुढील रणनिती ठरविण्यात येणार आहे.

- Advertisement -

आज (गुरूवार) सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर असलेल्या प्रांगणात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, किसान क्रांतीसह विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस सरपंच डॉ. धनजंय धनवटे, शेतकरी नेते धनजंय धोर्डे, किसान क्रांतीचे धनजंय जाधव, शिवसेनेचे सुहास वहाडणे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब चव्हाण, कामगार नेते सुभाष कुलकर्णी, सर्जेराव जाधव, नामदेव धनवटे, बाळासाहेब जाधव, सुधाकर जाधव, संभाजी गमे, डॉ. अविनाश चव्हाण, दत्ता धनवटे, चंद्रकात वाटेकर, शिवसेनेचे अनिल नळे, भाऊसाहेब केरे, दिलीप वहाडणे, किशोर वहाडणे, उपसरपंच महेश चव्हाण, साहेबराव बनकर, प्रभाकर बोरबणे, बाळासाहेब भोरकडे, सोन्याबापू तुरकणे, प्रताप वहाडणे, रविशंकर जेजुरकर सह पुणतांबा, डोणगाव, बाबतारा, पुरणगाव पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी डॉ. धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण, धनजंय जाधव, सुहास वहाडणे, नामदेव धनवटे, सुभाष कुळकर्णी, चंद्रकात वाटेकर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी आंदोलन सुरु करण्याचा निर्धार व्यत्त केला. ज्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस शिल्लक आहे त्यांना प्रति एकर दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, कांद्याला प्रति क्विंटल 2000 रुपये हमी भाव द्यावा, घटनेतील परिशिष्ट 9 कलम रद्द करावे, दुधालाही हमीभाव मिळावा, दिवसा नियमित वीज पुरवठा व्हावा, सर्व प्रकारच्या शेतमालाला हमी भाव द्यावा. यासह शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सर्वच नेत्यांनी स्पष्ट केले.

1 जून 2017 रोजी पुणतांब्यातील शेतकर्‍यांनी शेतकरी संपाचे अनोखे आंदोलन केले होते. या आंदोलनास राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र ज्या पुणतांबेकरांनी आंदोलनाची सुरुवात केली त्यांच्यात गटबाजी पुढे आल्यामुळे काही दिवसानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मागील आंदोलनाची पुनरावृत्ती आता घडू नये म्हणून या आंदोलनात एकवाक्यता ठेवण्याची गरज सर्वांनीच स्पष्ट केली. ज्या नेत्यांवर वरिष्ठांचा दबाव येईल त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा फेरविचार करावा, असे काही नेत्यांनी मनोगतात स्पष्टपणे नमूद केले.

सध्या सर्वच शेतमालाचे भाव कमी झाले असून महागाईमुळे शेतकरी वर्गात तीव्र अंसतोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु झाले तर त्यास चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या