Friday, May 3, 2024
Homeनगर15 चारी परिसरात बिबट्याची दहशत

15 चारी परिसरात बिबट्याची दहशत

राहाता |वार्ताहर| Rahata

येथील 15 चारी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेती कामाला शेतमजूर मिळत नसल्याने वन विभागाने तात्काळ याठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी 15 चारी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

राहाता येथील 15 चारी परिसरात टिळेकर वस्तीवर रविवारी रात्री निखिल महादेव टिळेकर यांच्या अल्सेशियन कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करत घायाळ केले. मानेजवळ मोठ्या प्रमाणात जखम होऊन रक्तस्राव झाल्याने या कुत्र्याचा काही वेळातच मृत्यू झाला. बिबट्याचा वावर वाढला असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर कामानिमित्त जाण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस व फळबागा असल्याने बिबट्या दिवसा याठिकाणी आसरा घेतो व रात्रीच्यावेळी सायंकाळी 7 नंतर अनेकांना दर्शन देतो. 15 चारी येथील सोनवणे फार्म, राहुल सदाफळ, मुरादे, गांधी, गिरमे, बोठे, लांडगे यांच्या वस्तीवर बिबट्याने अनेकदा दर्शन देऊन अनेकांचे पाळीव कुत्रे तसेच शेळ्यांना आपले शिकार बनवले आहे.

15 चारी परिसरात बिबट्याने गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी व शेतात काम करण्याकरिता मजूर मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. रात्रीचे वेळी दुचाकी मोटरसायकल व सायकल चालकांना घरी किंवा कामानिमित्त शहरात जाण्याकरिता जीव मुठीत धरून जावे लागते. वन विभागाने तात्काळ याठिकाणी पिंजरा लावून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घालत अनेकांची पाळीव कुत्री तसेच शेळ्यांना आपले भक्ष बनवले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. तसेच रात्रीच्यावेळी महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. वन विभागाने तात्काळ याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांना उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.

– भगवान टिळेकर, माजी संचालक गणेश कारखाना

- Advertisment -

ताज्या बातम्या