राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी रेल्वे स्टेशन येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना दिनांक 17 जुलै रोजी घडली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई सोबत राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात राहते.
दिनांक 17 जुलै रोजी रात्री 10 वाजे दरम्यान ती मुलगी जेवण व घरातील रोजची कामे झाल्यानंतर झोपी गेली होती. मात्र पहाटे चार वाजे दरम्यान ती घरातून बेपत्ता झाली. सकाळी उठल्यावर मुलगी बेपत्ता झाल्याचे तीच्या आईच्या लक्षात आले. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्या मुलीचे अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या आईने राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली. आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शहामद शेख करीत आहेत.