Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedकान्हाची दही हंडी..

कान्हाची दही हंडी..

श्रावण महिना म्हणजे सणांची रेलचेल. नागपंचमी, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, दहीहंडी. ”गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला” ”गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा” ही गीत ऐकायला आली की समजून जायचे आसपासचे गोपाळ दहीहंडी फोडण्यासाठी गोळा झालीत. श्रावण सुरू होताच छोट्या मोठ्या गोपाळांना या दहीहंडीचे वेध लागतात.

पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला गेला आहे. गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरून खात असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या गोपींनी शिंक्यात बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे. हजारो जास्त वर्षे उलटून गेली. तरी कृष्णाने सुरु केलेली ही परंपरा अजून कायम आहे. ह्या परंपरेमागे एक अर्थ लपला आहे. हा अर्थ आम्ही आपणास सांगणार आहोत.

- Advertisement -

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. कृष्ण हा भगवान महाविष्णुंचा आठवा अवतार. त्या अवताराची प्रगटन तिथी म्हणजे अष्टमी. अष्टमीच्या दुसर्‍या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. दही हंडी हा फक्त एक खेळ नाही. सगळे मिळून एकत्र आले तर कठीण वाटणारी यशाची हंडी काबीज करता येते हा गर्भितार्थे त्यामागे लपला आहे.

कृष्ण आपल्याला संदेश देतो की, सर्वजण एकत्र आलो तर मोठं यश सहजच मिळवू शकू. एकत्र आल्यामुळे सामूहिक शक्ती उभी राहते आणि मोठं यश मिळवता येते. जर देशावर-समाजावर संकट आलं असेल तर ते परतवून लावता येतं. कुठले मोठे संकट आले तर सगळ्यांनी एकत्र येऊन कसे दोन हात करायचे आणि संकट कसे दूर करायचे हे श्रीकृष्णाने सगळ्या गोकुळवासीयांना दाखवून दिलं होते.

गोकुळवासीयांनी श्रीेकृष्णाच्या म्हणण्यानुसार इंद्र देवतेची पुजा केली नाही तेव्हा इंद्र देव गोकुळावर कोपले. आणि त्यांनी गोकुळावर भयानक विजांचा कडकडाट करत मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकर्‍यांना संकटात टाकले. घरे, शेती, गाई-गुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशावेळी घाबरायला हवा होता. पण कृष्णच तो…तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली ठेवली. गावकर्‍यांनी त्याला गावात आलेल्या पुराची बातमी देऊन तूच आता यातून वाचावं अशी मागणी केली.

आपल्या गावावर संकट आलं हे ऐकूनही कृष्ण शांत होता. जणू या संकटातही तो कोणतीतरी संधी शोधात होता. कृष्णाने गोकुळातील सगळ्यांना सांगितलं की आपण सारे मिळून गोवर्धन पर्वत उचलू आणि पर्वताखाली आश्रय घेऊ. पावसापासून बचाव करू. हा उपाय अशक्यच होता. पर्वत कोणी उचलू शकतो का? पण कृष्णाने धीर दिला आणि सांगितले की, गोवर्धन मी उचलेल अट फक्त एकच आहे, प्रत्येकाने पर्वत उचलायला आपल्या काठीचा आधार द्यायचा.

खरंच सगळेजण काठ्या घेवून आले. कृष्णाने फक्त करंगळी लावली आणि इतरांनी काठ्या टेकवून गोवर्धन पर्वत उचलला. सगळं गोकुळ गोवर्धनाखाली आलं आणि पावसापासून बचाव झाला. सगळ्या गोकुळवासीयांना वाटलं की पर्वत कृष्णाने उचलून धरला. पर्वत खरंच कृष्णाने उचलला का…? नाही. श्रीकृष्णाने काहीच केले नाही. फक्त धीराची करंगळी लावली.

ह्याचा अर्थ असा आहे की इतरांचा आत्मविश्वास जागा करणारा कोणीतरी एक असावा लागतो. मग इतरांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. सामूहिक शक्ती उभी राहते आणि अशक्य कामसुध्दा शक्य होतं. आपत्ती दूर होते. एक विश्वासाची करंगळी फार मोठी किमया करते. मी पाठीशी आहे असं जरी कोणी सांगितलं तरी दहा हत्तींचं बळ येतं. मग संकटांवर मात करायला फारसा वेळच लागत नाही हो…

कृष्ण पाठीशी उभा राहतो, सगळ्यांना गोळा करतो आणि यशाची हंडी फोडतो. पण कृष्ण सहज प्राप्त होत नाही. अर्जुनाला तरी कुठे सहज विजय मिळाला होता. कृष्ण महायोद्धा होता. अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकल्यावर कृष्ण पांडवांकडून लढू शकला असता. पण त्याने अर्जुनाला सांगितलं की तुझं युद्ध तुलाच लढावं लागेल. तुझा संघर्ष तुलाच करावा लागेल. जर तू लढणार असशील तर मी तुझा रथ चालवेन. पण तू लढलास तर….नाहीतर मी रथ सोडून निघून जाईन..!

सांगयच तात्पर्य हेच की, कृष्ण त्याच्या पाठीशी उभा राहतो जो स्वतः प्रयत्न करतो. हातपाय गाळून न बसता जो स्वतः संघर्ष करायला तयार होतो त्याला कृष्ण मार्ग दाखवतो. म्हणून कृष्ण हवा असेल तर स्वतः प्रयत्न करावे लागतील. स्वतःची लढाई स्वतःला लढावी लागेल. जर अनेकजण एकत्र येऊन संघर्ष करत असतील तर तिथेही कृष्ण प्रकटतो. दही हंडीमधून हाच तर संदेश दिला गेला आहे.

पूर, दुष्काळ बेकारी, उपासमारी, महामारी ही सर्व संकटे म्हणजे एक हंडी आहे, जी सगळ्यांनी मिळून फोडायची आहे. सगळे एकत्र आले तर कृष्णही धावून येईल की हो आपल्या मदतीला. त्याच्याच मदतीने ही देशावर असलेल्या संकटाची हंडी सर्वांनी मिळून फोडता येईल. हो ना….?

– वर्षा श्रीनिवास भानप

9420747573

- Advertisment -

ताज्या बातम्या