Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्या‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय; जयंत पाटलांचा खोचक टोला

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास रस्त्यावरून वाहतोय; जयंत पाटलांचा खोचक टोला

पुणे | Pune

पुण्यामध्ये परतीच्या पावसामुळे अक्षरश: हाहाकार उडाला आहे. पुणे स्टेशन परिसरापासून ते दगडू शेठ हलवाई मंदिरापर्यंत पाणीच पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पाण्यात गाड्या वाहून गेल्या आहेत. पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले की, पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास रस्त्यावरून वाहत आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे. पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंतदेखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पुण्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवून दिला होता. सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या. रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली.

रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता. शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला. तर हवामान विभागने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या