Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यावसुबारस : दीपोत्सवाचा पहिला दिवस

वसुबारस : दीपोत्सवाचा पहिला दिवस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सणांचा राजा म्हणजे दिवाळी( Diwali Festival ) . करोनाच्या महासंकटातून सर्व जग सावरताच पुन्हा सर्व मोठ्या उत्साहात सण साजरे व्हायला लागले. त्यामुळे यंदाच्या दिवाळी सणाची मजा काही औरच आहे. शुक्रवारी (दि.21) दिवाळीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होत आहे. अश्विन वैद्य एकादशी वसुबारस (गोवस्य द्वादशी)चा शुभ मुहूर्त सायंकाळी 4.45 वाजेपासून ते 8.15 वाजेपर्यंत आहे.

- Advertisement -

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देवदेवतांप्रमाणे प्राणीमात्राचीदेखील पूजा हिंदू धर्मात केली जाते. पोळा सणाला शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतो. त्याचप्रमाणे आज वसुबारस म्हणजे गाय-वासरू यांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात गाईला गोमाता असे संबोधले आहे. गाईमध्ये 36 कोटी देव वास्तव्य करतात म्हणून गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गाईचे दूध, गोमूत्र व शेण यांचा वापर पवित्र पूजेसाठी केला जातो. म्हणूनच गाईला गोमाता असे म्हणतात. समुद्रमंथनातून ज्या पाच कामधेनू प्रकट झाल्या त्यात कपिला, गौतमी, सुरभी, गोमती व नंदा या गोमाता होत्या. त्यापैकी नंदा या गाईची पूजा आपण तिच्या वासरासोबत आज करतो. वसू म्हणजे सूर्य, कुबेरधन सर्वांमध्ये वास करणारा व वात्सल्य होय. बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी दिलेल्या शुभमुहूर्तावर गाय-वासराची पूजा केली जाते.

आपल्या जवळपास गोठा असेल तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन गाय-वासरूची पूजा करावी. गाईच्या पायावर पाणी घालून हळदी-कुंकू लावावे. गाईच्या कपाळावर हळदी-कुंकू लावून आरती ओवाळावी व प्रदक्षिणा घालावी. गाईला उडदाचे वडे व गोडधोड नैवेद्य खाऊ घालावा. मात्र गाईला शक्यतो तळलेले पदार्थ खाऊ घालू नये. या दिवशी बर्‍याच महिला उपवास करतात व सायंकाळी वसुबारसची पूजा झाल्यानंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांनी उपवास सोडतात. गाईच्या दुधापासून केलेले पदार्थ आज सेवन करू नये. कारण आज तरी गाईचे दूध वासराला पूर्णपणे पिऊ द्यावे, गाईचा पान्हा हा वासरासाठीच सुटलेला असतो. इतर दिवशी आपण आपल्यासाठी दुधाचा वापर करतोच.

शहराच्या ठिकाणी गोठा नसल्यामुळे गाय-वासरू नसते. अशावेळी आपण घरातच पाटावर नवे वस्त्र टाकून गाय-वासराची प्रतिकात्मक मूर्ती ठेवून मूर्ती नसेल तर चित्र किंवा तांदळाने गाय-वासराची प्रतिकृती काढून घरातच हळदी-कुंकू वाहून तुपाचा दिवा लावून फूल वाहावे. पाटाच्या भोवती रांगोळी काढावी व मनोभावे पूजा करून तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलड.कृते ! मातं ममार्मिलश्रित सफल करू नंदिनी अर्थात हे सर्वात्मक सर्वज्ञदेवांनी अलंकृत हे नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर, अशी प्रार्थना म्हणून पूजा करावी.

अंगणातील तुळशीसमोर दिवाळी सणाचा पहिला दिवा लावावा. अंगणात रांगोळी काढावी व आकाशकंदिल लावून विद्युत रोषणाई करावी. कारण दिवाळीचा सण हा दीपोत्सव म्हणून ओळखला जातो. घरातील सर्वांनी गोमातेची सवत्स गायीची पूजा करावी. गोमातेचे रक्षण व संवर्धन करण्याचे आपल्या परीने प्रयत्न करावेत.आजच्या दिवशी गोशाळेला दान करावे. गोमातेचा उद्धार करून दिवाळी सणाला शुभारंभ करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या