Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedस्मरण: कवी मनाचा गीतकार

स्मरण: कवी मनाचा गीतकार

– डॉ. अरुण स्वादी

गीतकार साहिर लुधियानवी (Lyricist Sahir Ludhianvi) यांची आज पुण्यतिथी! त्यानिमित्त त्यांच्या काव्यप्रवासाच्या आठवणींना उजाळा.

- Advertisement -

कुणीतरी म्हटले आहे, सिनेमाच्या (Cinema) क्षणभंगुरतेवर मात करतात ते गीतकारांचे बोल ..त्यांचे शब्द..ते चिरंजीव असतात. तेच लाखमोलाचे ठरतात आणि काळावर मात करतात.

‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुश्किल, उसे एक खूबसूरत मोड देकर भूलना बेहतर’ किंवा ‘हर फिक्र को धुवेमें उडाता चला गया’ हे खूबसूरत शब्द काळाच्या ओघात वाहून तर गेलेच नाहीत तर आजही तरुण पिढीच्या मनावर गोंदले गेले आहेत. असे भन्नाट लिहिणारा गीतकार साहिर लुधियानवी (Lyricist Sahir Ludhianvi) सर्वोत्कृष्ट होता का हे मला माहीत नाही, पण तो इतरांपेक्षा खूप खूप वेगळा होता आणि त्याच्या वेगळेपणातच त्याचे मोठेपण होते .तो अतिशय मानी होता, मनस्वी होता, त्यापेक्षाही जास्त हळवा होता. विरोधाभास हा होता की तो कायम कोणत्यातरी भीतीने पछाडलेला होता.

खरं सांगायचं तर तो कवी जास्त आणि गीतकार (Songwriter) कमी होता. हे म्हणजे कपिल देव गोलंदाज जास्त आणि फलंदाज थोडा कमी म्हटल्यासारखे होईल. त्यामुळे त्याने लिहिलेली गाण्यात शेरोशायरी जास्त पण ती मागणी तसा पुरवठा या पद्धतीची बिलकुल नव्हती. एकूणच हा इसम आगळावेगळा होता. भाषा आणि मनाने देखील. त्या काळात शैलेंद्र, हसरत जयपुरी, मजरूह सुलतानपुरी, शकील बदायुनी, कैफी आझमी आणि राजा मेहंदी अली खानसारखे एक से एक बढकर गीतकार होते, पण साहिर लुधियानवी या सगळ्यांना टक्कर देत आपले अग्रस्थान टिकवून होता. असं म्हणायचे की साहिर गायकापेक्षा एक रुपया जास्त मानधन घ्यायचे.

त्यामुळे लताजी त्याच्यावर थोडेसे नाराज होत्या. खरे खोटं देव जाणे, मी तर हे हेही ऐकले आहे की, ऑल इंडिया रेडिओवर (All India Radio) पूर्वी गीतकाराचे नाव सांगितले जायचे नाही ते सांगितलंच पाहिजे हे साहिरनेच त्यांना ठणकावून सांगितले .त्यामुळे गीतकाराला क्रेडिट मिळायला लागले. संस्कारक्षम वयात… म्हणजे प्रेम, इश्क मोहब्बत वगैरे समजायच्या आणि करायच्या वयात आम्हाला साहीर लुधियानवी समजायला जरा जड जायचा. त्याचं उर्दुपण आमच्या मराठीपणाची करारी परीक्षा घ्यायचा. मात्र अर्थ समजला नाही तरी साहिर ग्रेट माणूस आहे एवढं मात्र कळायचं. जसं-जसं वय वाढू लागलं आणि हिंदी व उर्दू समजायला लागलं (निव्वळ गैरसमज) तसतसा साहिरच्या शब्दातली श्रीमंती जाणवायला लागली.

साहिर एकूण गंभीर प्रकृतीचा ,त्यामुळे त्याची गाणी थोडीफार तशीच असायची, पण त्यात खूप मतितार्थ असायचा. मला वाटतं साधना त्याचा पहिला गाजलेला चित्रपट ..त्यातलं ते गाणं ‘औरतने जनम दिया मर्दो को, मर्दो ने उसे…’सारखं गॉस्पल ट्रुथ लिहिलं आणि पुन्हा मागे वळून बघितलं नाही. तो फिल्म लाईनमध्ये फारसा यशस्वी होणार नाही, अशी अटकळ काही जणांची होती, पण तो नुसता यशस्वी नाही तर ऑल टाइम ग्रेट बनला. गुरुदत्तचा ‘प्यासा’ हा त्याचा कदाचित, गीतांच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ चित्रपट. त्याच्या ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ या गाण्यातून गरीब-श्रीमंत हा सामाजिक भेदभाव त्याला किती खटकतो हे त्याने सांगितले आहे.

‘जिन्हे नाज है हिंदपर वो कहा है’ असा स्पष्ट सवाल करत त्याने आपल्या समाजातल्या बेगड्या देशप्रेमाला हात घातला आहे. साहिर मुळात बंडखोर वृत्तीचा होता. लाल रंगाचा प्यारा होता. त्याचा हा स्वभाव आणि डावी विचारसरणी त्याच्या बऱ्याच चित्रपटातील गाण्यातून दिसून यायची. साधना चित्रपटातलं ‘औरतने जनम दिया मर्दो को मर्दो ने उसे…’ गाण्यातून त्याने पुरुषी स्वामित्वावर व त्याच्या स्वार्थी वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि एका वेगळ्या विषयाला हात घातला. हे सारे हेच दर्शवते की साहीर कवी जास्त आणि गीतकार कमी होता. तरीही तो अफाट यशस्वी ठरला.

साहिरची जोडी कुणाबरोबर नव्हती, पण एस डी बर्मन आणि रवी बरोबरचे त्यांचे बरेच चित्रपट हिट ठरले. रवी तसा सामान्य संगीतकार, पण साहिरच्या ओघवत्या व अर्थपूर्ण गीतांमुळे त्याचे बरेच चित्रपट हिट झाले. गुमराह, वक्त, हमराज, धुलका फुल, आदमी और इन्सान हे बी. आर. प्रोडक्शनचे चित्रपट गाण्यांमुळे गाजले. बी. आर. चोप्रा आणि नंतर यश चोप्रा यांच्याबरोबर त्याने शेवटपर्यंत काम केले. कोणी म्हणतात रोशनने त्याला बॉलीवूड मध्ये आणलं. शक्य आहे. ‘ताजमहल’ या चित्रपटातली गाणी एक से एक बढकर होती. ‘पौव छूने दो फूलों को इनायत होगी’ किंवा ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’सारखी हळुवार नाजूक प्रेमाची गाणी या चित्रपटाचे सौंदर्य स्थान होते .

कुणी म्हणतात, एस. डी. बर्मनने त्याला चित्रपटात गाणे लिहायची संधी दिली. त्याने एक ट्यून दिली. त्यावर साहिरने गाणे रचले. ‘ठंडी हवाये लहराके आये’ हे ते गाणे.. .तसेही त्याच्या गीतांमध्ये नेहमी निसर्ग भरलेला असे. चांद, हवा, नदीचा उल्लेख खूपदा असे. ‘तदबीर से बिगडी हुई तस्वीर बना ले’ या बाजीतल्या गाण्याने त्याला नाव दिले. ‘प्यासा’मधल्या दशावतारी गाण्यांनी त्याला अग्रस्थानावर नेऊन ठेवले. त्यातली हिट गाणी माझं क्रेडिट आहे, असं म्हटल्यामुळे बर्मनदा त्याच्यावर नाराज झाले आणि त्यांची मैत्री तुटली.

‘हम दोनो’ हा साहिरच्या फिल्मी जीवनातला महत्त्वाचा टप्पा! जयदेवने संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातील गाणी नुसती हिट झाली नाहीत तर त्यांनी साहीरचा अद्वितीय दर्जा जगापुढे आणला .’अभी न जावो छोडकर’ किंवा ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’सारखी गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. साहिर आणि ओ.पी नय्यर हे कॉम्बिनेशन नैसर्गिक वाटतं नाही, पण ‘तुमसा नही देखा’ ते ‘नया दोर’ हा त्यांचा भन्नाट प्रवास खूपच सुखकर होता. घोड्यांच्या टापांचा आवाज वापरायला नय्यरने ‘तुमसा नही देखा’पासूनच सुरूवात केली.

साहीरने अंदाजे शंभरहून जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. त्यातले बहुतेक चित्रपट हिट झाले. ‘ताजमहल’ व ‘कभी कभी’सारख्या चित्रपटाने त्याला फिल्मफेअर अवॉर्डही मिळवून दिले. उतरत्या काळातही ‘आ गले लग जा’ चित्रपटातली ‘मेरा तुझसे था पहलेसे नाता कोई’ गाण्याने हलचल मचा दी थी. आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र साहीर लुधीयानवी फारसा सुखी नव्हता. अमृता प्रीतम आणि सुधा मल्होत्रा त्याच्या खास मैत्रिणी होत्या, पण का कोण जाणे त्याने विवाह केला नाही.

त्याला म्हणे भीती वाटायची की होणारी सून आपल्या आईला त्रास तर देणार नाही ना? ही भीती तशी प्रत्येक पुरुषाला असतेच, पण साहिरप्रमाणे सगळ्यांनीच असा लग्न न करायचा निर्णय घेतला तर काय होईल जगाचं? गेल्या वर्षी साहिरची जन्मशताब्दी झाली. ती मोठ्या प्रमाणात साजरी झाली, पण योगायोग पाहा. २५ ऑक्टोबरला त्याची आणि ३१ ऑक्टोबरला त्याचा एके काळचा घनिष्ट मित्र सचिन देव बर्मन यांची पुण्यतिथी येते. बॉलीवूडच्या फिल्मी संगीतातील दोन दिग्गज कलाकारांना या निमित्ताने कुर्निसात करावा आणि त्यांच्या आठवणी जागवाव्यात यासाठी हा लेखप्रपंच!

- Advertisment -

ताज्या बातम्या