Friday, May 3, 2024
Homeब्लॉगरविवार शब्दगंध : गृहराज्यातील अग्निपरीक्षा

रविवार शब्दगंध : गृहराज्यातील अग्निपरीक्षा

गुजरात विधानसभा निवडणूक (Gujarat Assembly Elections)अखेर घोषित झाली आहे. गुजरातमधील परिस्थिती दिल्ली आणि पंजाबप्रमाणे झाली आहे. भाजप (BJP) काँग्रेस (Congress) आणि आआपा (AAP) एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) तेव्हा नवख्या असलेल्या आआपाला कोणी गणतीत धरत नव्हते, पण याच पक्षाने झंझावाती कामगिरी करून भाजप आणि काँग्रेसचा पाचोळा केला होता. पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. आता गुजरातमध्येसुद्धा आआपाच्या विजयाची हॅटट्रिक घडवण्याचा इरादा गुजराती जनतेचा मनात असेल का?

बहुप्रतिक्षित गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने अखेर नुकतीच केली. 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यांत गुजरातमध्ये निवडणूक होणार आहे. त्याआधी हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 8 डिसेंबरला होणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक एकाच वेळी घोषित होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पंधरवड्याआधी फक्त हिमाचलची निवडणूक जाहीर झाली. गुजरातची निवडणूक घोषित झाल्यावर आम आदमी पक्षाचे (आआपा) समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तत्काळ ‘ट्विट’ करून आत्मविश्‍वासपूर्ण प्रतिक्रिया नोंदवली.

- Advertisement -

‘गुजरातची जनता यावेळी मोठा बदल घडवायला सज्ज झाली आहे. आम्ही जरूर जिंकू!’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त करून भाजपची धडधड वाढवली आहे. याउलट आआपाची काहीच हवा नाही, आमचा सामना थेट भाजपशी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आहे. तर विकासामुळे गुजरातची जनता खूश असून ती पुन्हा भाजपलाच पसंती देईल, असा आशावाद भाजपच्या अनाम गुजराती नेत्यांकडून व्यक्त होत आहे. तथापि यावेळच्या निवडणुकीत मतदान करताना गुजराती मतदारांचीसुद्धा कसोटी लागणार आहे.

गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य! 13 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच राज्याचे रहिवासी आहेत. त्यामुळे केवळ भाजपच नव्हे तर मोदी-शहांसाठीसुद्धा गुजरातची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि गृहराज्यातील अग्निपरीक्षा ठरणार आहे. 25 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये राज्य करीत आहे. ‘विकासाचा आदर्श’ (डेव्हलपमेंट मॉडेल) म्हणून गुजरातचे उदाहरण भाजपकडून इतर राज्यांपुढे ठेवले जाते. गुजरातआधी हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. तेथेही भाजपची सत्ता आहे, पण पंतप्रधानांसह सर्वच भाजप नेत्यांनी गुजरातवर जास्त लक्ष केंद्रित केले यात आश्चर्य नाही. कारण गुजरात निवडणूक निकालाचा थेट परिणाम पुढे होणार्‍या सर्व निवडणुकांवर संभवतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत गुजरातची सत्ता राखणे भाजपसाठी अपरिहार्य आहे.

गुर्जरभूमीवर पुन्हा विजयपताका फडकावण्याचा निर्धार भाजप नेत्यांनी केला आहे. प्रचारासाठी नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्वतोपरी ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण ती मोहीम सपशेल फसली. पश्चिम बंगालमध्ये फक्त तृणमूलला हरवायचे होते, पण गुजरात निवडणुकीत भाजपपुढे एक नव्हे तर दोन-दोन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

मागील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत झाली होती. त्यावेळी कशाबशा 99 जागा जिंकून भाजपला सत्ता राखता आली. काँग्रेसने 77 जागा जिंकून भाजपची दमछाक केली होती. गुजरातच्या रणभूमीवर आतापर्यंत दोन राष्ट्रीय पक्ष निवडणूक रिंगणात असत. यावेळच्या निवडणुकीत आम आदमी पक्षदेखील कंबर कसून मैदानात उतरला आहे. काँग्रेसला गणतीतही न धरता या पक्षाने थेट भाजपलाच आव्हान दिले आहे.

दिल्ली आणि पंजाब राज्ये जिंकल्यानंतर भाजपची सत्ता असलेल्या गुजरातवर आआपाने सारे लक्ष केंद्रित केले आहे. गुजरात निवडणुकीची खूप आधीपासून आआपाची तयारी सुरू आहे. निवडणूक घोषित होण्याच्या महिनाभर आधीच या पक्षाने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. सभा, संमेलने, मेळावे आणि आम जनतेच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी जवळीक साधण्याची रणनीती अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अवलंबली आहे. गुजराती जनतेकडून अनुकूल प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही आआपाचे प्रमुख नेते करीत आहेत.

दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मोफत वीज, पाणी आणि इतर आश्वासने आआपाने दिली आहेत. आआपा हा आश्वासनांची पूर्तता करणारा पक्ष असल्याचे दिल्ली आणि पंजाबातील जनतेने अनुभवत आहे. एक संधी आम्हाला द्या, असे आवाहन आआपा नेते आता गुजराती जनतेला करीत आहेत. त्या आवाहनाला तेथील जनता प्रतिसाद देईल का याची उत्सुकता देशातील जनतेला असणारच! तिरंगी लढतीमुळे भाजपला निवडणूक सोपी जाईल, असा तर्क लढवला जात आहे. तिरंगी लढतीचा फायदा कोणत्या तरी एका पक्षाला होऊ शकतो हे खरे, पण फायदा नेमका कोणत्या पक्षाला होणार? सत्ताविरोधी वातावरणाचा फटका भाजपला बसेल का? काँग्रेसला मतदार साथ देतील का? की दोन्ही राष्ट्रीय पक्षांना डावलून आम आदमी पक्षाला सत्तेचा मार्ग मोकळा करून देणार?

गुजरातमधील परिस्थिती दिल्ली आणि पंजाबप्रमाणे झाली आहे. भाजप, काँग्रेस आणि आआपा एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत तेव्हा नवख्या असलेल्या आआपाला कोणी गणतीत धरत नव्हते, पण याच पक्षाने दिल्ली निवडणुकीत झंझावाती कामगिरी करून भाजप आणि काँग्रेसचा पाचोळा केला होता. अलीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती झाली. आता गुजरातमध्येसुद्धा संधी देऊन आआपाच्या विजयाची हॅटट्रिक घडवण्याचा इरादा गुजराती जनतेचा मनात असेल का? ‘विकासाचा आदर्श’ मानल्या गेलेल्या गुजरातची जनता तेवढ्यावर समाधानी नसावी, त्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, अशी भीती केंद्र आणि गुजरातमधील सत्ताधार्‍यांना वाटत असावी. ती नाराजी दूर करण्याच्या इराद्याने महाराष्ट्रात होऊ घातलेले फॉक्सकॉन, टाटा-एअरबससह 4 मोठे उद्योग प्रकल्प गुजरातकडे वळवण्यात आले.

गुजरातचा विकासाचा आदर्श भ्रामक असल्याचा हल्ला विरोधी पक्ष चढवत आहेत. मतदार विचलित होऊ नयेत म्हणून निवडणूक घोषित होण्याआधी गुजरातवर विकास योजनांचा वर्षाव करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. तोच कित्ता महाराष्ट्रासाठीसुद्धा गिरवला गेला आहे. भल्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीचे आश्‍वासन खुद्द पंतप्रधानांनी जाहीरपणे दिले आहे. हे आश्‍वासन ‘जुमले’बाजी ठरणार नाही, याची काळजी राज्यातील भाजप नेत्यांना घ्यावी लागणार आहे. गुजरातमध्ये अनपेक्षित निकाल आले तर त्याचे परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होतील, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. म्हणूनच काही झाले तरी गुजरात हातून निसटू नये याकरता भाजपचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधान मोदींचे गृहराज्यातील दौरे वाढले आहेत. आतापर्यंत अनेक जाहीर सभा त्यांनी घेतल्या. विविध विकासकामांची उद्घाटने आणि भूमिपूजने केली. मध्यंतरी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 10 दिवसांची गुजरात गौरवयात्रा काढली. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह पक्षाच्या बड्या नेत्यांनी त्यानिमित्त गुजरातमध्ये पायधूळ झाडली. विकासाची गंगा गुजरातकडे वळवण्याचे भाजपचे युद्धपातळीवरचे ऐनवेळचे असे प्रयत्न गुजराती जनतेला आकर्षित करतील का?

‘गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी तुम्ही कोणाला पाहू इच्छिता?’ असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी गुजराती जनतेला जाहीरपणे केला होता. त्यासाठी त्यांची मतेही मागवली होती. त्या मतांचा आदर राखत केजरीवाल यांनी आआपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून माजी पत्रकार ईसूदान गढवी यांच्या नावाची घोषणा नुकतीच केली. जनमताचा आदर करण्याची ही भूमिका मतदारांना प्रभावित करणारी ठरू शकेल. आआपाला या निवडणुकीत विजयाची मोठी उमेद असली तरी गमावण्यासारखे काही नाही, पण भाजप आणि काँग्रेसच्या दृष्टीने मात्र ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जाते. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात येऊन पुढे जाणार आहे. ती गुजरातमधून जाणार नसली तरी यात्रेनिमित्त झालेल्या वातावरण निर्मितीचा लाभ गुजरात निवडणुकीत काँग्रेसला होईल, असे पक्ष नेतृत्वाला वाटत असेल. नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस गुजरात निवडणुकीला सामोरे जात आहे. नेतृत्वबदलाचा सकारात्मक परिणाम निवडणुकीत दिसेल, अशीही काँग्रेस नेत्यांना अपेक्षा आहे. यावेळी भाजपवर मात करून काँग्रेस गुजरातची सत्ता जिंकेल, असा विश्‍वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तसे झाले तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या यशाची ती पायाभरणी ठरेल.

भाजप हाच आपला प्रतिस्पर्धी असल्याचे काँग्रेस आणि आआपा नेते सांगत आहेत. दोन्ही पक्षांचा एकच प्रतिस्पर्धी असेल तर त्याला पराभूत करण्यासाठी हे पक्ष एकत्र का आले नाहीत? तिरंगी लढतीनंतर गुजरातमध्ये त्रिशंकू निकाल आले तर? अशा स्थितीत काँग्रेस आणि भाजप सत्तेसाठी कदापी एकत्र येऊ शकणार नाहीत, पण भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी परस्पर सहकार्याची भूमिका घेऊन काँग्रेस आणि आआपाला कदाचित तडजोड करावी लागेल. या शक्यतेचा विचार दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला असेल वा करीत असतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या