Saturday, May 4, 2024
Homeनगरमाय-लेकीच्या ताब्यातील पर्स लांबविली

माय-लेकीच्या ताब्यातील पर्स लांबविली

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

कापडबाजारातून खरेदी करून घरी परत येत असताना माय-लेकीच्या ताब्यातील पर्स अज्ञात चोरट्याने बळजबरीने चोरून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला मार्कंडेय सोसायटीजवळ घडली. या पर्समध्ये 16 हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

अफिफा हबीब शेख (वय 46 रा. मार्कडेय सोसायटी, गुलमोहर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी फिर्यादी व त्यांची मुलगी कापडबाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदीनंतर त्या दुचाकीवरून घराकडे येत असताना त्यांच्या दोघींच्यामध्ये पर्स ठेवलेली होती. त्यात दोन मोबाईल, तीन एटीएम कार्ड, चार हजार रुपये रोख रक्कम व एक हजार रुपये किंमतीचे खरेदी केलेले कपडे असा 16 हजार रुपयांचा ऐवज होता.

मार्कंडेय सोसायटीजवळ दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने फिर्यादीकडील पर्स बळजबरीने ओढली. फिर्यादीच्या मुलीने विरोध केला असता दुचाकीचा तोल जाण्यापूर्वीच त्यांनी पर्स सोडून दिली. चोरटा पर्स घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या