Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याIND vs NZ 2nd T20 : भारतीय संघासाठी 'करा वा मरा'ची स्थिती,...

IND vs NZ 2nd T20 : भारतीय संघासाठी ‘करा वा मरा’ची स्थिती, न्यूझीलंडविरुद्ध जिंकावेच लागेल

लखनौ | Lucknow

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (२९ जानेावरी) रोजी लखनौ येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी हा ‘करो या मरो’ सामना असेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा २१ धावांनी पराभव झाला होता. अशा स्थितीत मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला लखनौ येथील सामना जिंकावाच लागणार आहे.

- Advertisement -

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा T20 (India vs New Zealand 2nd T20) आज सायंकाळी ७ वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना लखनौच्या श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर (Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) खेळवला जाणार आहे.

अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांना अनुकूल राहिली आहे. या खेळपट्टीवर आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. हवामान स्वच्छ राहील आणि कमाल तापमान संध्याकाळी १५ अंशांच्या आसपास राहील.

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी झाली. यामुळे दुसऱ्या सामन्यात फलंदाजांवर अधिक जबाबदारी असेल.भारताच्या गोलंदाजांनाही डेथ ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करावा लागेल. पहिल्या सामन्यात डेरील मिचेलने २०व्या षटकात कुटलेल्या २७ धावा निर्णायक ठरल्या होत्या. पहिला सामना भारतीयांनी २१ धावांनी गमावला. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यामुळे भारतीय गोलंदाजीचा कमकुवतपणा स्पष्ट झाला.

उमरानने आपल्या एका षटकात १६, तर अर्शदीपने अखेरच्या षटकात २७ धावा मोजल्या. भारताचे प्रमुख फलंदाजही पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले.धावांचा पाठलाग करताना केवळ १५ धावांमध्ये भारताने आघाडीचे तीन फलंदाज गमावले होते. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताला दीडशेचा पल्ला पार करता आला. या कामगिरीनंतरही वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता कमी वाटत आहे. कारण, कर्णधार हार्दिक पांड्या अर्शदीपला आणखी एक संधी देऊ शकतो.

एकदिवसीय सामन्यांची मालिका गाजवलेल्या शुभमन गिलला टी-२० क्रिकेटमध्ये आपला जलवा दाखवता आलेला नाही. त्याने आतापर्यंत केवळ चार आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असल्याने त्याला दुसऱ्या सामन्यात आणखी एक संधी नक्की मिळेल. भारतीय संघाला चिंता भेडसावत आहे ती ईशान किशन आणि अष्टपैलू दीपक हुडा यांच्या हरपलेल्या फॉर्मची. बांगलादेशविरुद्ध गेल्या वर्षी झळकावलेल्या एकदिवसीय द्विशतकानंतर किशनला आपल्या लौकिकानुसार फलंदाजी करता आलेली नाही. टी-२० मध्ये किशनने अखेरचे अर्धशतक गेल्यावर्षी १४ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावले होते. 

दुसरीकडे, आक्रमक फलंदाज म्हणून छाप पाडण्यात हुडालाही अपयश आले आहे. गेल्या १३ सामन्यांमध्ये त्याने केवळ १७.८८च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो केवळ १० चेंडूंत १० धावा काढून परतला होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सूर्यकुमार यादव आपल्या लौकिकानुसार शानदार फटकेबाजी करत आहे. परंतु, त्याला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या