Friday, May 3, 2024
Homeब्लॉगधरणी फाटते तेव्हा...

धरणी फाटते तेव्हा…

तुर्कीतील शक्तिशाली भूकंपाने झालेली जीवित आणि वित्तहानी प्रचंड असून मदतीसाठी भारताने दाखवलेली तत्परता अत्यंत मोलाची आहे. खरे पाहता तुर्कीसारख्या भूकंपप्रवण क्षेत्र असणार्‍या देशात अलीकडच्या काळात भूकंपविरोधी प्रणालींवर मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले होते. पण ताज्या भूकंपाने ते सगळे फोल ठरवले. असे असताना काही जुन्या अभ्यासाची नव्याने उजळणी करण्याची गरजही लक्षात घ्यायला हवी.

तुर्की हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. 1999 मध्येही तिथे 8.1 क्षमतेचा भूकंप आला होता. अलीकडच्या काळात तुर्कीमध्ये मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक प्रगती झाली. त्यामध्ये त्यांनी भूकंपविषयक अनेक आयामांचा बारकाईने अभ्यास करून रस्ते, इमारती भूकंपविरोधी वा भूकंपातही सुरक्षित राहण्याजोग्या असाव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन केले. तुर्कीचे यासंबंधीचे नियम आणि निकष अर्थात कोड अत्यंत प्रभावी आणि नुकसान टाळणारे आहेत.

या देशात होणारे भूकंप अनातोलियन या पर्वतशृंखलेमध्ये होतात. ताजा भूकंप गाझियन टीप या ठिकाणी झाला असून तिथे जवळपास 20 लाख लोकांची वस्ती होती. भारत सरकारकडून तुर्कीला तातडीची मदत देण्यात आली. भूकंपानंतर तासाभरात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी तेथील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली आणि कोणत्या प्रकारची मदत हवी, याचा तपशील मागवला. तिथून मिळालेल्या माहितीनुसार भारताची दोन विमाने तुर्कीकडे तातडीने रवाना झाली. एका विमानात राष्ट्रीय आपत्ती निवारण सेनेचे 100 लोक होते तर दुसर्‍या विमानात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. याखेरीज रुग्णांसाठी आवश्यक ती औषधे, तंबू, पांघरुणे, जीवनावश्यक सामान आणि मलब्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेणारी कुत्रीही पाठवण्यात आली.

- Advertisement -

हा भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी झाला. सहाजिकच लोक झोपेत असल्यामुळे अधिक मनुष्यहानी झाली. तुर्कीजवळ मृत समुद्र आहे. त्यामुळे त्सुनामीचा धोकाही व्यक्त केला होता. मात्र हा धोका टळल्याने दिलासा मिळाला. हा जमिनीवरील भूकंप होता, याखेरीज त्याचा केंद्रबिंदू समुद्रापासून बराच लांब होता. त्यामुळेच हा धोका उद्भवला नाही. माणसाने कितीही प्रगती केली तरी भूकंपाचे पूर्वनिदान करता येत नाही, असे म्हटले जाते. भूकंपावर सखोल अभ्यास करणार्‍या तुर्कीसारख्या देशामधील दुरवस्थेने हे विधान सत्य असल्याचे अनेकज ण सांगतील. मी यावर संशोधन केले असून दिल्लीतील तुर्कीच्या दूतावासाकडे त्याचे पेपर्स पाठवले आहेत. दोन गोष्टींची नोंद घेतली तर भूकंपाचे पूर्वानुमान समजू शकते. त्यातील एक बाब म्हणजे भूकंप होण्यापूर्वी शंभर तास संबंधित भागातले मोबाईल चालत नाहीत.

ताजा भूकंप 8.1 क्षमतेचा होता. तो पाचशे किलोमीटर भागामध्ये तीव्रतेने जाणवला. भूकंपाच्या 100 तास आधी या परिसरातील सगळे मोबाईल बंद पडलेले असू शकतात. दुसरी बाब म्हणजे भूकंपाच्या 15 तास आधी त्या परिसरातील जनावरे आणि पक्षी मोठ्याने ओरडतात आणि घाबरून सैरावैरा पळू लागतात. त्यांच्या या कृतीवरूनही भूकंपाची शक्यता लक्षात घेता येते. हे ताज्या भूकंपाप्रसंगी घडल्याचे काही ताज्या व्हिडिओंमधून पाहायला मिळाले. वैज्ञानिक प्रगतीबरोबरच या जुन्या तोटक्यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.

ताज्या भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून 300 किलोमीटर अंतरावर एका गावात खूप हानी झाली. अशी हानी वेगळ्या प्रकारची असते. त्यात साधारणत: आठ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारती जमीनदोस्त होतात. एक-दोन मजल्यांच्या इमारतींना काहीही झळ पोहोचत नाही. या प्रकाराला लाँग वेव्ह वा लाँग सरफेस वेव्ह म्हणतात. तुर्कीमध्ये प्रथमच या प्रकारची हानी झाल्याचे दिसून आले. 1999 मध्ये इथे मोठा भूकंप झाला होता तेव्हा अशा प्रकारची लाँग वेव्ह आढळून आली नव्हती. त्यामुळेच यंदा जाणवलेल्या या बदलाचीही नोंद घ्यायला हवी, तसेच त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला होता. मुज्जफराबाद येथील भूकंपाने डेहराडुनपर्यंत हानी झाल्याचे बघायला मिळाले. म्हणजेच ही हानी आधी उल्लेख केलेल्या लाँग वेव्हमुळे झाली होती. मी सीमेपर्यंत जाऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केला होता.

तुर्कीतील ताज्या भूकंपात झालेली जीवितहानी मोठ्या प्रमाणात असणार यात शंका नाही. जाहीर झालेल्या आकड्यापेक्षा ही संख्या कैकपट अधिक असेल. अशावेळी मलब्यामध्ये अडकलेल्यांची संख्याही खूप मोठी असते. अशावेळी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी तसेच त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरू होणे गरजेचे असते. दबलेल्या भिंतीखाली लोक अडकले असतील तर आपल्याकडे एक अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात येते. पूर्वी काँक्रिट वा स्टील कापून त्याखालील लोकांची सुटका करावी लागत असे. मात्र यात बराच वेळ जातो. त्यामुळे आता लेझर तंत्राद्वारे स्टील वा काँक्रिट कापण्याचे काम पार पडते. हे काम अत्यंत वेगाने आणि अचूक पद्धतीने होते. ही मदत भारत सरकारने तुर्कीकडे पाठवली आहे. त्यामुळे लेझर कटिंगमुळे तिथे अडकलेले लोक लवकरात लवकर बाहेर पडू शकतील, अशी आशा आहे. याखेरीज या संकटातून वाचलेले लोक कोणत्या भागात लोक अडकले असू शकतात याची माहिती देतात. त्यानुसारही कामाला गती मिळते. उदाहरणार्थ, अमूक जागी एक कुटुंब होते, इथे आमची इतकी माणसे राहत होती अशी माहिती मिळताच तेथील कामाला वेग मिळतो आणि अडकलेल्यांची वेळेत आणि सुरक्षितरीत्या काढण्याचे प्रयत्न केले जातात.

ढिगार्‍यात अडकलेल्यांचा माग घेणारी कुत्री या आपत्तीमध्ये मोठी मदत करतात. अडकलेल्यांचे स्थळ ओळखण्याचे विशेष प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले असते. त्यामुळेच अशी शक्यता जाणवल्यास कुत्री जोरात भुंकतात. त्यावरून तिथे वेगाने काम हाती घेऊन अडकलेल्या लोकांची सुटका केली जाते. भारताने तातडीने पाठवलेल्या मदतीत अशाच कुत्र्यांचा सहभाग आहे. याद्वारेही गरजूंपर्यंत वेगाने मदत पोहोचणे शक्य होणार आहे. सध्या विशिष्ट प्रकारचे कॅमेरे विकसित करण्यात आले आहेत. त्याद्वारेही अडकलेल्या लोकांची माहिती मिळते आणि मदतकार्याला नेमकी दिशा आणि वेग मिळणे शक्य होते. सध्या उपग्रहांद्वारे मिळणार्‍या छायाचित्रांचा उपयोग अनेक कामांमध्ये होत असतो. भूकंपासारखी आपत्तीची स्थितीही त्याला अपवाद नाही. भूकंपाच्या वेळी अवकाशातील उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रात वस्तू, घरे, इमारतींची माहिती मिळते; त्याचप्रमाणे घराघरांमध्ये दिसणार्‍या दिव्यांवरूनही परिसरातील लोकसंख्येचा अंदाज बांधता येतो. त्यावरूनही मदतकार्याला दिशा मिळणे शक्य होते. ताजा भूकंप पहाटे झाल्यामुळे हानीचे प्रमाण वाढले आहे. तोच दोन-तीन तासांनंतर झाला असता तर बरीच जीवितहानी टळली असती, कारण लोक जागे होऊन आपापल्या कामासाठी बाहेर पडले असते. काही नाही तर किमान धोका जाणवून ते धावत घराबाहेर तरी पडले असते. मात्र काळाने वेळ साधली, असेच म्हणावे लागेल.

भूकंपामध्ये माणसे अडकतात तेव्हा वाचण्याची शक्यता इमारतीच्या स्थितीवर अवलंबून असते. ती काँक्रिटची आहे, दगडी आहे की मातीची आहे, बांधताना भूकंपविरोधी प्रणालीचा वापर केला आहे का, इमारत किती जुनी आहे असे अनेक घटक मृतांची संख्या वाढणार की मर्यादित राहणार हे ठरवतात. आपल्याकडे लातूरला पहाटे चारला असाच शक्तिशाली भूकंप झाला होता. संपूर्ण परिसरात दगडी घरे असल्यामुळे त्यात प्रचंड मनुष्यहानी झाली. याउलट मातीची घरे असल्यास भूकंपात मनुष्यहानी कमी होते. हे सगळे लक्षात घेता ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीनुसार आपणही भूकंपविरोधी प्रणालीनुसार घरबांधणीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. तरच भूकंपासारख्या आपत्तीमध्ये आपण सुरक्षित राहू शकू.

- Advertisment -

ताज्या बातम्या