Friday, May 3, 2024
Homeनगरदेवगडला दत्तजयंतीनिमित्त सहा लाखांवर भाविकांची गर्दी

देवगडला दत्तजयंतीनिमित्त सहा लाखांवर भाविकांची गर्दी

देश सुजलाम् सुफलाम् व्हावा व सर्व जाती-धर्मांत एकोपा राहवा – भास्करगिरी

देवगडफाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. यावेळी ‘दिगंबरा..दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’च्या जयघोषाने देवगडनगरी दुमदुमली होती. दिवसभरात सुमारे सहा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

दत्त मंदिर प्रांगणात दत्त जन्म सोहळा साजरा झाला. यावेळी महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते पाळणा दोरी ओढण्यात आली. दत्त जन्म अभंग व आरती झाली. याप्रसंगी महाराज मंडळी, राजकीय पुढारी, शासकीय अधिकार्‍यांसह लाखो भाविक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले, भारत देश सुजलाम् सुफलाम् व्हावा व देशात सर्व जाती-धर्मात एकोपा राहावा ही प्रार्थना भगवान दत्तात्रय यांच्या कडे करूया. समर्थ किसनगिरी बाबाच्या अथक परिश्रमाने भगवान दत्तात्रय या ठिकाणी विसावले. समर्थ किसनगिरी बाबांनी हा दत्त जयंती उत्सव सुरू केला. त्यांच्या आशीर्वादाने आपण हे काम पुढे चालवत आहोत. माणूस हीच जात आहे. राम मंदिरात दर्शन घेण्याच्या योग सर्व देशवासियांना आला आहे. देश, धर्म, देव यांच्यासाठी कृतज्ञ रहा. समर्थ किसनगिरी बाबा भक्तांसाठी जीवन जगले.

या प्रसंगी महंत आनंद चैतन्यगिरी महाराज, आमदार शंकरराव गडाख, सुनीलगिरी महाराज, भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरूआई पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, अ‍ॅड. सुनील चावरे, आप्पा बारगजे, राऊत महाराज, संतोष माने, बजरंग विधाते, बाळासाहेब पाटील, अजय साबळे आदी उपस्थित होते.

श्री दत्तजयंती निमित्त महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पालखीची क्षेत्र प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. तालुक्यातील अनेक गावच्या दिंड्या देवगड येथे दाखल झाल्या होत्या.

श्री दत्तजन्माच्या वेळी सायंकाळी 6 वाजता ‘दिगंबरा…दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिंगबरा..’ या दत्तनामाचा गजर व पुष्पवृष्टी करीत दत्तजन्मोत्सव साजरा झाला. श्री दत्त जयंतीनिमित्त पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांना श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या रांगेचे रुपांतर नंतर मोठ्या दर्शनबारीत झाले.

भाविकांना रांगेत व शिस्तीत दर्शन घेता यावे म्हणून नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक, देवगड सेवेकरी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवकांचे सेवाभावी मंडळ व गुरुदत्त माध्यमिक विद्यालय देवगड व गुरुदास भास्करगिरी महाराज विद्यालय जळके खुर्द येथील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली.

यावेळी भगवान दत्तात्रयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिध्देश्वर मंदिर, मुख्य प्रवेशद्वारावर केलेली भव्य विद्युत रोषणाई उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरली.

श्री दत्त जयंती सोहळयानिमित्त देवगड येथे मोठी यात्रा भरली होती. यात्रेत विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रेतील दुकानदारांना व्यवसायासाठी संस्थानच्यावतीने जागेची व्यवस्था करण्यात आली होती.

नेवासा, नगर, औरंगाबाद, श्रीरामपूर, गंगापूर या आगारातून भाविकांसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.पहाटेपासून रात्रीपर्यंत भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांची उच्चांकी गर्दी होती. नेवासा एसटी आगाराच्यावतीने गंगापूर, नगर, शेवगाव, तारकपूर, श्रीरामपूर, औरंगाबाद येथे जाण्यासाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. आज गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या