Friday, May 3, 2024
Homeनगरशिर्डीतून कोणत्याही प्रकारचा मानवी व्यापार होत नाही

शिर्डीतून कोणत्याही प्रकारचा मानवी व्यापार होत नाही

उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात हरवलेल्या व्यक्तींचे प्रमाण इतर धार्मिक देवस्थानच्या तुलनेत फारच कमी असून शिर्डी पोलीस ठाण्यात मिळून आलेल्या व्यक्तींचे कारण पाहता घरात भांडणे, कमी मार्क्स मिळाल्याने, पती-पत्नीचे पटत नसल्याने, प्रेम प्रकरणातून तसेच भौगोलिक परिस्थितीचे कारण माहिती नसल्याचे या लोकांनी सांगितल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे शिर्डीतून कोणत्याही प्रकारे मानवी व्यापार तसेच तस्करी होत नसल्याचे मत शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

- Advertisement -

दरम्यान मंगळवार दि. 17 रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की इंदोर मध्यप्रदेश येथील साईभक्त मनोजकुमार सोनी यांनी दि. 10 ऑगस्ट 2017 रोजी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास माझी पत्नी दीप्ती मनोज सोनी वय 35 ही शिर्डीतील प्रसादालयापासून दुकानातून सामान घेऊन येते असे म्हणून निघून गेली मात्र ती परत आली नाही याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नंबर 39 /2017 दि. 11 ऑगस्ट 2017 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती.

सदरची मिसिंग व्यक्ती ही मिळून न आल्याने यातील खबर देणारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन 1191 /2018 अन्वये दिनांक 2 ऑगस्ट 2018 रोजी दाखल केली आहे. त्या अनुषंगाने तक्रारदार व साक्षीदार यांच्याकडे शिर्डी, येवला, इंदोर, नाशिक, मालेगाव, राहाता, शिंगणापूर, भिवंडी, मनमाड, साकीनाका याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शोध घेतला आहे. तसेच आधारकार्ड, पासपोर्ट, एअरपोर्ट यांचे एजन्सीसोबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

मिसिंग व्यक्ती ही तिच्यासोबत मोबाईल घेऊन गेली नसून सीडीआर व एसडीआर माध्यमातून माहिती मिळाली नाही. तरी याबाबत वरिष्ठ व उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे निकषानुसार तपास करीत असल्याचे सांगितले.शिर्डी हे आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेले धार्मिक क्षेत्र असून याठिकाणी देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. शिर्डी शहरात नेहमीच वर्दळ असते. बर्‍याचवेळा भाविकांना ते राहत असलेले ठिकाण सापडणे कठीण होते, त्याचबरोबर शिर्डी शहरात येणारे भाविक हे मुख्यत्वे परराज्यातील असल्याने त्यांची बोलीभाषा ही वेगळी असल्याने त्यांचे स्थानिक लोकांशी नीटनेटके संभाषण होत नाही.

मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर बर्‍याचवेळा गर्दीच्या कारणास्तव आपल्यापासून त्यांची चुकामुक होते, त्यामुळे नातेवाईक हरवल्याबाबत खबर देण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात. परंतु खबर देणारे हे घरी गेल्यानंतर व त्यांची मिसिंग व्यक्ती त्यांना मिळून आली अगर कसे ? त्याची माहिती फोन करून कळवत नसतात. त्याचबरोबर भाषेचा प्रश्न असल्याने बर्‍याच वेळा खबर देणार्‍यांशी संवाद साधला असता भाषेची अडचण असल्याने व्यवस्थितरित्या संवाद होत नाही. त्यामुळे काहीएक माहिती उपलब्ध होत नसल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

ऑक्टोबर 2017 पर्यंत एकूण मिसिंग झालेल्या व्यक्तींची संख्या 71 असून यामध्ये पुरुष 36 तर महिला 35 आहेत, यापैकी मिळून आलेल्या व्यक्तींची संख्या 45 असून यामध्ये पुरुष 21 तर महिला 24 आहेत. तसेच न मिळालेल्या व्यक्तींची एकूण संख्या 26 असून यामध्ये पंधरा पुरुष तर 11 महिला आहेत. सन 2018 मध्ये एकूण मिसिंग झालेल्या व्यक्तींची संख्या 82 असून यामध्ये पुरुषांची संख्या 46 तर महिलांची 36 आहे, त्यापैकी मिळून आलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 58 असून यामध्ये 28 पुरुष तर 30 महिला आहे. तसेच न मिळालेल्या व्यक्तींची एकूण संख्या 24 असून यामध्ये 18 पुरुष व 6 महिला आहेत. सन 2019 मध्ये मिसिंग झालेल्या व्यक्तींची एकूण संख्या 82 असून यामध्ये 34 पुरुष तर 48 महिलांचा सहभाग आहे यापैकी मिळून आलेल्या व्यक्तींची संख्या एकूण 68 असून यामध्ये पुरुषांची संख्या 26 तर महिलांची संख्या 42 आहे तसेच न मिळून आलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 14 असून यामध्ये 8 पुरुष तर 6 महिला आहे. दरम्यान 1 जानेवारी 2017 ते डिसेंबर 2019 पर्यंत एकूण मिसिंग व्यक्तीपैकी मिळून न आलेल्या व्यक्तींची संख्या 64 आहे. यामध्ये जास्तीत जास्त जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश आहे.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्यामुळे याठिकाणी वर्षभरात अडीच ते तीन कोटी भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. नुकत्याच दिनांक 22 नोव्हेंबर 2019 ला औरंगाबाद खंडपीठात झालेल्या आदेशामध्ये न्यायालयाने म्हटले होते मिसिंग झालेल्या व्यक्तींच्या बाबत याठिकाणी मानवी शरीर अवयव विक्रीचे काही रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली होती, त्या अनुषंगाने आपण शिर्डी शहरात अँटी ट्रॉफिक पथकाची निर्मिती करणार असून त्याचबरोबर लोकल पोलिसांची पथके तयार करणार आहोत.
-सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक,शिर्डी

- Advertisment -

ताज्या बातम्या