Friday, May 3, 2024
Homeनाशिकपारावरच्या गप्पा : ‘नागरिकत्व’ कायदा म्हंजी काय रं भौ?

पारावरच्या गप्पा : ‘नागरिकत्व’ कायदा म्हंजी काय रं भौ?

नाशिक | गोकुळ पवार

(चार पाच पोरांबरोबर शहाणी माणसं बसलेली )

- Advertisement -

तुळश्या : काय रे पोराओ , म्या ऐकलं ते खर हाय का?
संत्या : पण काय ऐकलं त्वा
तुळश्या : दोनचार दिसा पासन टीव्हीवर दाखवायला लागलेत ते ? मोर्चे , आंदोलने, गाड्या जाळल्या ?
संत्या : ते होय, अख्खा देशभर चालू हाय ते.. आपल्या राज्यातबी मोठ्या शहरांमध्ये मोर्चे काढले
रंग्या : म्या काय म्हणतोय, पर कशापाई एवढी जाळपोळ अन आंदोलन….

तान्या : अर केंद्र सरकारनी कुठला कायदा आणलाय म्हण, त्येंचापाई झालंय समदं..
तुळश्या : कुठला कायदा हाय त्यो?
संत्या : नागरिकत्व कायदा
(तेवढ्यात तुक्या पारावर येतो.)
तुक्या : काय पोराओ आज लय मोठा इशय घेतलाय तुम्ही ? मलाबी सांगा, मी नुसता ऐकून आहे पर समजलं काहीच नाही..

(समदी जण मान हलवित्यात )
संत्या : तात्या, नागरिकत्व कायदा म्हंजी या कायद्यानुसार, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ईसाई धर्मांचे जे सदस्य ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आले आहेत, आणि ज्यांना त्या देशांमध्ये धार्मिक अन्याय सहन करावा लागला आहे, अशा नागरिकांना बेकायदेशीर नागरिक मानता येणार नाही. तर, या कायद्यानुसार आता अशा नागरिकांना भारताची नागरिकता देण्यात येणार आहे.

तुक्या : म्हंजी, बाहेरून आलेल्याना भारतात राहण्याची मुभा दिली जाईल तर… पर मग त्याची काही अट आहे का?
संत्या : तात्या, यासाठी सध्या भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान ११ वर्षं राहणं आवश्यक असतं. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना भारतात राहता येणार आहे.
भग्या : मग ही लोक कामून मोर्चे , आंदोलने करत आहेत?
संत्या : त्या लोकांचं म्हणणं असं आहे कि या कायद्यामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत आहे. तसेच बाहेरून आलेल्या लोकांना जर भारताच नागरिकत्व दिल तर आपसूकच लोकसंख्या वाढ होईल. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न यामुळे अन्य इतरही समस्या निर्माण होऊ शकतात. असे एकूणच विरोध करणाऱ्यांचे गाऱ्हाणं आहे.

तुक्या : शासनाने यावर इचार करायला हवा, लोकांना कायदा पटवून द्यायला हवा, त्यामुळे लोकांमधील गैरसमज दूर होण्यास मदत होईल, अन्यथा या कायद्याद्वारे कुणी भारतीयांचं नुकसान होत असेल तर वेळीच कायद्याला विरोधही व्हायला हवा…
तुळश्या : आता समजलं, एवढी आंदोलने कशापाई चाललीत ते, पाटील तुम्ही सांगाल ती पूर्वदिशा आपणही याबाबत ग्रामपंचायत मध्ये बैठक घ्यायला पाहिजे. लोकांना या कायद्याबाबत समजले पाहिजे. नुसते टीव्हीवर पाहून काही उमजत नाही.
तुक्या : अगदी खरं , उद्याच मिटिंग बोलवा..देशात काय चाललंय याची बातमी गावखेड्यापर्यंत पोहचली पाहिजे. उद्या आपल्या नागरिकत्वावर कुणी आवाज उठवला तर?

(समदी जण, व्हय व्हय म्हणत घराकडे जातात..)

- Advertisment -

ताज्या बातम्या