Sunday, May 5, 2024
Homeनगरएनआरसी मुद्यावर सरकारला झुकवणारच : सौरव

एनआरसी मुद्यावर सरकारला झुकवणारच : सौरव

बेमुदत धरणे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरुच, अनेक मान्यवरांच्या भेटी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) हे राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टरचं (एनआरसी) पहिलं पाऊल असून देशातील युवा शक्तीने सरकारचा हा डाव हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. नागरिकांनी त्यांना समर्थन देऊन त्यांची ताकद वाढवावी, असे आवाहन ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आइसा) संदीप सौरव यांनी केले.

- Advertisement -

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक व प्रस्तावित नागरिकत्व रजिस्टर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी संविधान बचाव समितीच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन शहरातील मौलाना आझाद चौक येथे करण्यात आले आहे. आंदोलकांना संबोधित करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक याकूब बागवान होते. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्षा गीता कुमारी व जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थी नेत्री चंदा यादव उपस्थित होत्या.

संदीप सौरव म्हणाले की, यापूर्वी कधीही अनुभवाला न आलेल्या घटना या सरकारच्या राजवटीत घडत आहेत. धर्माच्या आधारावर नागरिकत्व स्वीकारले अथवा नाकारले जाणार आहे. हा कॉम्रेड भगतसिंह व अश्पाकउल्लाच्या कल्पनेतील भारत नाही. याला सर्वप्रथम देशातील विद्यापीठातील विद्यार्थी वर्गाने विरोध केला. त्याचा राग मनात धरून सरकारने त्यांच्यावर सूड उगवायला सुरूवात केली. केंद्र सरकारच्या पोलिसांद्वारे विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहेत.

जे विद्यार्थी पोलिसांच्या हल्ल्याला बळी पडले आहेत, ते भविष्यात कधीही पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवू शकणार नाहीत. सरकारी यंत्रणा व पोलिसांच्या या वर्तनामुळे देशाच्या भावी नागरिकांचा व सामान्य नागरिकांचा सरकारच्या महत्त्वाच्या अंगांवरील विश्वास उडाला आहे. हा विश्वास दृढ करणे हे सरकारचे काम असून सरकार नेमके त्याच्या उलट काम करत आहे.

यावेळी चंदा यादव यांनी जामिया विद्यापीठात घुसून पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा अनुभव सांगितला. देशात नागरी स्वातंत्र्याचा संकोच होत असून, त्याचा बचाव करण्यासाठी नागरिकांनीच आता रस्त्यावर येणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी संविधान बचाव समितीचे सदस्य अहमदभाई जहागीरदार, मुजफ्फर शेख, अंजुमभाई शेख, साजिद मिर्झा, मुख्तार शहा, कॉ.जीवन सुरुडे, नागेशभाई सावंत, तीलक डुंगरवाल, धनंजय कानगुडे, अशोक दिवे, नईम शेख, एजाज बारुदवाले, शरीफ शेख, अख्तर शेख, सलीम जहागीरदार, फिरोज पठान, नाजीम शेख, फिरोज शेख, जावेद तांबोळी, महेबूब कुरेशी, तौफिक शेख, नदिम तांबोळी, जावेद तांबोळी, मुल्ला पठाण, अमोल सोनवने, अमरप्रीत सींग, लकी सेठी, के. सी. शेळके, अशोक बागुल, फैय्याज इनामदार, श्रीकृष्ण बडाख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या