Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रगर्भाशय कर्करोगाचे थैमान

गर्भाशय कर्करोगाचे थैमान

मधुरा कुलकर्णी

गर्भाशयाच्या कर्करोगाची वाढती समस्या ही जगभरची गंभीर समस्या बनत चालली आहे. कारण पूर्वी तीस वर्षांपुढील वयोगटात ही समस्या आढळून येत असे. आता मात्र विशीतच हा कर्करोग आढळत आहे. गर्भाशयाच्या किंवा

गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण भारतातही वाढत आहे. जगातल्या या आजाराच्या रुग्णांपैकी एक पंचमांश रुग्ण भारतात आढळतात, एवढी ही चिंता वाटण्याजोगी बाब आहे. 2015 मध्ये जगातल्या 38 लाख महिलांना हा कर्करोग झाला होता आणि  90 हजार महिलांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

भारतात दरवर्षी सुमारे 1 लाख 30 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. 2025 पर्यंत गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या महिलांची भारतातली संख्या सुमारे 2,26,000 असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजार जीवघेणा असल्यामुळे याविषयीची भीतीही महिलांमध्ये पसरल्याचे आढळते. मात्र तरीही यासाठीची पॅपस्मिअर चाचणी वेळेवर करून घेतली जात नाही.

त्यामुळे महिलांची मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. 2002 मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाने 74,118 महिलांचा मृत्यू झाला होता, तर अलीकडे हा आकडा 2 लाख 70 हजारपर्यंत पोहोचला आहे.

कर्करोगामुळे मुळातच मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असले तरी भारतात मरण पावणार्‍या एकूण कर्करुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. भारतात स्तनाच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग आढळतो. मात्र याविषयी महिलांमध्ये पुरेशा प्रमाणात जागृती झालेली नाही.

सहसा हा कर्करोग 30 ते 45 या वयोगटात आढळतो. 12 वर्षांच्या आधीच पाळी सुरू होणे, 55 वर्षांनंतर मेनोपॉज येणे, इस्ट्रोजेन उपचार करून घेणे, टाईप 2 मधुमेह असणे, धूम्रपान, तंबाखूचा वापर, खालावलेला सामाजिक, आर्थिक स्तर आणि अँटिऑक्सिडंटस्चे प्रमाण कमी असलेला आहार अशीही यामागची कारणे सांगितली जातात.

शिवाय कमी वयात लैंगिक संबंध राखले जाणे, लठ्ठपणा, हार्मोनल गर्भनिरोधकांचा दीर्घकाळ वापर, गर्भधारणेचे जास्त प्रमाण आणि अस्वच्छता ही या कर्करोगाची काही प्रमुख कारणे आहेत. मुले जन्माला न घालणार्‍या महिलांनाही हा कर्करोग होत असल्याचे आढळले आहे. याखेरीज गर्भाशयाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असणे, हेही एक महत्त्वाचे कारण आहे.

ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर सुमारे वीस वर्षांपर्यंत हा विषाणू सुप्तावस्थेत राहतो. त्यामुळे कर्करोग संसर्गानंतर 20 वर्षांनंतर उद्भवू शकतो. हा विषाणू लैंगिक संबंधांच्या वेळी एका व्यक्तीकडून दुसरीकडे संक्रमित होऊ शकतो.

योग्य वेळी निदान झाले तर या संसर्गातून सुमारे 99 टक्के महिला मुक्त होऊ शकतात. पॅपस्मिअर चाचणी करून घेण्याविषयी बहुतेक महिलांना माहिती नसते. एकदा ही चाचणी करून घेतल्यानंतर दर तीन वर्षांनी किंवा अगदी पाच वर्षांनीही ती केली तरी संसर्ग झाला असल्यास समजू शकते.

पॅपस्मिअरबरोबर एचपीव्ही डीएनए चाचणीही उपयुक्त ठरते. पेल्व्हिक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, बायोप्सी आदी चाचण्याही केल्या जातात. निदानाची खात्री करून घेण्यासाठी सीटी किंवा एमआरआय चाचण्या घेतल्या जातात.

लैंगिक संबंध राखताना वेदना होणे, पायांमध्ये किंवा योनी भागात वेदना होणे, थकवा येणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, एका पायाला सूज येणे ही या कर्करोगाची काही लक्षणे आहेत. शस्त्रक्रिया, रेडिएशन, हार्मोन उपचारपद्धती आणि किमोथेरपी असे यावरचे उपचार आहेत. कर्करोगाचा टप्पा, रुग्णाचे वय आणि सर्वसामान्य आरोग्य याचा विचार करून ते केले जातात.

शस्त्रक्रियेत सहसा गर्भाशय, बीजांडकोश आणि फॅलोपियन नलिका काढून टाकल्या जातात. रेडिएशन उपचार पद्धती आतून किंवा बाहेरून दिली जाते. किमोथेरपीद्वारे कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात. किमोथेरपीची मालिका असते आणि दोन किमोथेरपी चक्रांदरम्यान विश्रांतीची गरज असते. एकदा उपचार घेतल्यानंतरही काही काळाने हा कर्करोग पुन्हा होऊ शकत असल्याने उपचार पूर्ण झाल्यावरही ठरावीक कालांतराने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुन्हा तपासण्या करून घेत राहणे आवश्यक असते.

एचपीव्ही या विषाणूचे सुमारे 100 विविध प्रकार असून त्यांच्यामुळे अनेकदा शरीराच्या विविध भागांवर चामखिळ निर्माण होते. परंतु रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्याची लक्षणे किंवा गुंतागुंत दिसत नाही. त्यामुळे अचानकच चामखिळ निर्माण झाली तरीही तपासणी करून घेणे आवश्यक आहे. शक्यतो तिशीनंतर या कर्करोगाची चाचणी करून घेणे हा खरा प्रतिबंधक उपाय आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या