Saturday, May 4, 2024
Homeनगरकोल्हारच्या सोनाराने दिली नेवासा सराफाला लुटण्याची सुपारी !

कोल्हारच्या सोनाराने दिली नेवासा सराफाला लुटण्याची सुपारी !

श्रीरामपूरची टोळी गजाआड, महिलेचा सहभाग

  • कोल्हारात सोनाराच्या घरी शिजला कट
  • मास्टरमाइंड टाकळीभानचा लुटारू
  • टाकळीभानमार्गे संजयनगरमध्ये

अहमदनगर (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील पानेगाव-खेडले रस्त्यावर रस्ता विचारण्याच्या बहाण्याने डोळ्यात मिरची पूड टाकून निखील आंबिलवादे या सराफ व्यावसायिकाकडील 7 लाख 90 हजार 778 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ‘लुटी’ ची सुपारी चक्क कोल्हारमधील सराफ विजय उर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर यानेच दिली होती. त्यासाठी त्याने श्रीरामपूरच्या ‘लुटारू’ गँगला हाताशी धरून या कृत्याला अंजाम दिला. यातील चौघांना गजाआड करण्यात आले असून अन्य संबंधित सराफासह पाचजण पसार झालेत. त्यांचा एलसीबीचे पोलीस कसून शोध घेत आहेत.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे हा लुटेरे टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या लुटीत एका महिलेचाही सहभाग आहे.

निखिल बाळासाहेब आंबिलवादे (रा. खेडले परमानंद, ता.नेवासा) हे त्यांचे मांजरीतील गुरूकृपा ज्वेलर्स दुकानातील 7 लाख 90 हजार रूपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने घेऊन पानेगाव ते खेडले परमानंद रोडने पानेगाव शिवारातून जात असताना मोटारसायकलवरील तिघांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग चोरून नेली. ही घटना 21 जानेवारीला सायंकाळी 5.15 वाजता घडली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविली. अशातच पो. नि. दिलीप पवार यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे व त्याच्या सहकार्‍यांनी केला असल्याची माहिती कळाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या सहकार्‍यांमार्फत टाकळीभानचा निखील रणनवरे (वय 21),श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधील सोहेल जुबेर शेख (21) श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधीलच आवेज उर्फ बाबा जुबेर शेख (23), आणि नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता निखील रणनवरे याने कबुली दिली.

असा केला गुन्हा…
निखील रणनवरेसह बेलापुरातील चाँदनगरचा शाहरूख सांडू सय्यद, टाकळीभानचे मतीन पठाण, सोहेल जुबेर शेख, आवेज उर्फ बाबा जुबेर शेख, गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भिमराव रणनवरे, निखील रणनवरेचा जोडीदार शहारूख सय्यद (रा. श्रीरामपूर) याची माहिला नातेवाईक आलिशा आजीज शेख हिची देडगावकराशी ओळख आहे. या महिलेच्या माध्यमातून कोल्हारचा सराफ विजय देडगावकराच्या घरी सर्वजण जमले. तेथे खेडले परमानंद येथील आंबिलवादे या सराफाचे मांजरी येथे श्रीगुरूकृपा नावाचे सराफी दुकान आहे. रात्री तो दुकानातील सोने बॅगमध्ये भरून मोटारसायकलने घरी जातो. रस्त्यात अडवून त्याला मारहाण करा, सोने लुटा, त्याचा मोबादला देऊ असा कट देडगावकरच्या घरात शिजला. त्यानंतर लूट करण्यासाठी या टोळीने नियोजन केले.

त्यानुसार 21 तारखेला दुपारी शाहरूख सय्यद, गौरव अवसरमल, प्रकाश रणनवरे हे युनिकॉर्न मोटारसायकलवर होते. त्यानंतर आंबिलवादे यांच्या दुकानाजवळ पाहणी करण्यासाठी सोहेल शेखला सोडले. निखील रणनवरेसह अन्य आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. सोनार निखील आंबिलवादे यांनी दुकान बंद करताच, तेथे असलेल्या साहेलने रणनवरेला इशारा केला. लगेचच रणनवरेने स्वतःच्या मोबाईलवरून सोनार पांढर्‍या रंगाच्या मोपेड मोटारसायकलवर बॅग घेऊन निघाल्याची माहिती दिली. व या सोनाराचा पानेगाव चौकापर्यंत पाठलाग केला. व युनिकॉर्न मोटारसायकवर असणार्‍या शाहरूख, गौरव आणि प्रकाश यांनी आंबिलवादे यांना रस्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि सोने-चांदीची दागिने असलेली बॅग लांबविली.

लुटीनंतर टाकळीभान मार्गे ही टोळी श्रीरामपूरातील संजयनगरमधील अलिशा शेख हिच्या घरात एकत्र आली. तिने देडगावकराला फोन करून मोहीम फत्ते झाल्याची माहिती दिली. त्यावर देडगावकराने सोने घेऊन कोल्हारला येण्याचे सांगितले. शाहरूख सय्यद, निखिल रणनवरे, प्रकाश रणनवरे व अलिशा शेख नॅनो कारने कोल्हारला देडगावकरच्या घरी पोहचले. लुटलेल्या सोन्याचे 5 लाख वीस हजार रुपये देईल असे सांगत देडगावकराने काही पैसे दिले बाकीचे तीन दिवसांत देण्याचे ठरले असल्याची कबुली निखील रणनवरे याने पोलिसांना दिली.  अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश देण्यात आले.

लुटणारी गँग..
निखील शशिकांत रणनवरे (रा. टाकळीभान), सोहेल जुबेर शेख, आवेज ऊर्फ बाबा जुबेर शेख (दोघेही रा. वॉर्ड नं. 1, फातेमा सोसायटी, श्रीरामपूर) आणि मतीन गुलाब पठाण (रा. बेलपिंपळगाव, ता.नेवासा) या चौघांना अटक.

शाहरूख सांडू सय्यद (रा. बेलापूर), गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भीमराव रणनवरे (रा. टाकळीभान), आलिशा अजीज शेख (संजयनगर,श्रीरामपूर) आणि विजय ऊर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर (कोल्हार)हे सगळे पसार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या