Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘लगीन म्हने करी पाह्य.. नि घर म्हने बांधी पाह्य..; प्रतिष्ठेपायी लग्नात होतोय...

‘लगीन म्हने करी पाह्य.. नि घर म्हने बांधी पाह्य..; प्रतिष्ठेपायी लग्नात होतोय वारेमाप खर्च

खामखेडा। वैभव पवार
‘लगीन म्हने करी पाह्य.. नि घर म्हने बांधी पाह्य..’ अशी अहिराणीत म्हण आहे. अंथरूण पाहूनच पाय पसरावे, असेही जुन्या-जाणकारांनी सांगून ठेवले आहे. मात्र त्याकडे सारेच दुर्लक्ष करतांना दिसतात. हल्लीच्या काळात लग्नसहित्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर महागाईचे सावट आहे. मंडप, मंगल कार्यालयांची देखील भाडेवाढ झाली आहे. सर्वसाधारण व्यक्तीही लग्नासाठी चार लाखावर खर्च झाल्याचे सांगतो. परिणामी अवाढव्य खर्चामुळे अनेकजण कर्जाच्या विळख्यात अडकत असल्याचे आज दिसून येत आहे.

सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असून शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही खर्चिक लग्न सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात खर्चिक विवाहाला फाटा देऊन लग्न उरकण्याचीही उदाहरणे ग्रामीण भागात दिसताहेत. मात्र त्यांचे प्रमाण नगण्य आहे. अनेक जण कर्जबाजारी होऊन किंवा उधार-उसनवारने खर्चिक लग्न करीत असल्याचे दिसते. कुणी बँकेतून कर्ज काढून तर कुणी सावकाराचे दार ठोठावून मुला-मुलींचे लग्न पार पाडतात. प्रसिद्धी मिळविण्यासाठी लग्नात अवाढव्य खर्च करतात. याला कुठेतरी आळा बसण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. साखरपुड्यातच लग्न केले तर अनावश्यक खर्चाला फाटा दिला जातो. तथापि संसारोपयोगी साहित्य व इतर खर्चासाठी वधूपित्याला कर्ज काढावे लागते. किमान हा खर्च उपयोगी पडतो. लग्नामध्ये बँड, डीजे, मंडप, कपडेलत्ते खरेदी, जेवणावळ यावर सर्वाधिक खर्च होतो. वास्तविक या खर्चाचा भावी वधू-वरांना कोणताही उपयोग होत नाही.

- Advertisement -

सध्या ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्याने दोन्हीकडील मंडळी एकमेकांच्या विचाराने साखरपुड्यातच लग्न उरकवण्यावर भर देत आहेत. ही उदाहरणे ताजी असतांना दुष्काळातही कर्जबाजारी होऊन धूमधडाक्यात विवाह सोहळे साजरे करण्याचे प्रमाणही कमी झालेले नाही. गत तीन वर्षांपासून दुष्काळाने शेतकर्‍याची पाठ सोडलेली नाही. कधी अपुरा पाऊस तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पादन आले नाही. शेतीसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने अनेकांनी शेतीला जोडव्यवसाय सुरू केला असला तरी मुलींचे वडील शासकीय नोकरी असलेला जावई मिळाल्यानंतर उत्साहाच्या भरात अवाढव्य खर्च करतात. शेवटी त्या कर्जाची परतफेड वडिलांनाच करावी लागते.

कर्जफेडण्यासाठी कुणीही नातेवाईक धावून येत नाही. मग ‘चिडीया चुग गई खेत, फिर पछतानेसे क्या फायदा’ असे म्हणण्याची वेळ येते. काही भागात प्रतिष्ठा राखण्यासाठी लग्नसराईत कर्ज काढून खर्च करायचा व शेतीचे उत्पन्न हाती न आल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. पिकांच्या भरवशावर कर्ज घ्यायचे अन् निसर्गाच्या प्रकोपाने हाती काहीही न लागल्यास कर्ज कोठून फेडायचे? अशा विवंचनेला शेतकर्‍यांना सामोरे जावे लागते. त्यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने लग्न सोहळ्यांवरील अवाढव्य खर्चाला आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनावश्यक खर्चाला फाटा द्यावा
दुष्काळी स्थितीतही ग्रामीण भागात लग्न समारंभातील मिजास कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रसंगी कर्जबाजारी होऊन वर-वधूपिता धूमधडाक्यात लग्न सोहळे साजरे करीत असल्याचे दिसते. लग्नातील हे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जनजागृतीसह प्रशासन व सामाजिक संस्थानी पुढाकार घेणे गरजे झाले आहे. शेवटी लग्न दोन जीव व दोन कुटुंबाचे मिलन असते. त्यामुळे अनावश्यक टाळून काही पैसा भावी दाम्पत्याच्या भविष्यासाठी राहखून ठेवणे अधिक सोयीस्कर ठरू शकेल, असे मत सुज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या