Saturday, May 4, 2024
Homeनगरकोल्हार भगवतीपूरच्या बाजारात लॉकडाऊनचे तीन तेरा

कोल्हार भगवतीपूरच्या बाजारात लॉकडाऊनचे तीन तेरा

कोल्हार (वार्ताहर) – काल शुक्रवारी कोल्हार भगवतीपूर येथील आठवडे बाजाराचा दिवस. सकाळी 7 वाजताच भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने मांडली. तेव्हापासूनच हळूहळू बाजारतळावर गर्दी होऊ लागली. बघता बघता दोन तासात 9 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे भरणार्‍या बाजारासारखी स्थिती पाहायला मिळाली. प्रचंड गर्दी, आपापसातील सुरक्षित अंतर कोणीही राखले नाही. निम्म्याहून अधिक लोकांच्या चेहर्‍याला मास्क अथवा रुमाल नव्हते. तोबा गर्दीचा लोंढा पाहता अखेरीस पोलिसांनी 9 वाजता यात हस्तक्षेप केला. आणि अवघ्या दहा मिनिटात बाजार उठवून मोकळा केला.

सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. त्याअंतर्गत 144 कलमान्वये जमावबंदी व संचारबंदीच्या सूचनाही सर्वज्ञात आहेत. याच धर्तीवर गेल्या शुक्रवारी येथील आठवडेबाजार बंद ठेवण्यात आला. मात्र फारशी गर्दी होणार नाही. नागरिक नियमांचे पालन करतील या अपेक्षेवर काही भाजीपाला विक्रेत्यांना ठराविक अंतरावर बसविण्याचे नियोजन ग्रामपंचायतने केले होते.

- Advertisement -

मात्र लोकांच्या सुविधाकरिता घेतलेला हा निर्णय चांगलाच अंगलट आला. विक्रेते आणि ग्राहकांनी कोरोना विषाणूची पर्वा न करता सर्व नियम धाब्यावर बसवून मुक्तपणे बाजारतळावर गर्दी केली. अवघ्या दोन तासात प्रचंड गर्दीने भरलेले बाजारतळ पाहून गावातील सुज्ञ नागरिकांनी यावर संताप व चिंता व्यक्त केली. याचवेळी श्री भगवती देवीच्या मंदिरावरील ध्वनिक्षेपकावरून गर्दी टाळण्याचे व आपापसातील अंतर राखण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत होते.

मात्र त्याकडे सर्वांनीच सपशेल दुर्लक्ष केले. ग्रामपंचायतचे कर्मचारी ग्राहकांना व विक्रेत्यांना आवश्यक सूचना करत होते. मात्र त्याकडे पूर्णतः कानाडोळा केला जात होता. निम्म्याहून अधिक लोकांच्या तोंडाला रुमाल नव्हते. एकमेकांना खेटून चाललेली गर्दी नियमितपणे आठवडे बाजार भरतो त्याप्रमाणेच लोकांनी आपली वर्तणूक व आचरण ठेवले होते. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी होती.

लोकांची वाढती गर्दी पाहता अखेरीस पोलीस प्रशासनाने हातामध्ये काठी घेऊन दुकाने उठविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे जमलेल्या गर्दीला पांगविण्यास प्रारंभ केला. अवघ्या दहा मिनिटात बाजारतळ रिकामे केले. अखेरीस ग्रामपंचायतने वंदे मातरम चौकामध्ये रस्त्यावर बॅरेगेट उभारून बाजार बंद हा फलक लावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या