Friday, May 3, 2024
Homeनाशिकमुंबई नाका पोलिसांना सलाम! पोलीस गाडीतून गर्भवतीस पोहोचवले रुग्णालयात

मुंबई नाका पोलिसांना सलाम! पोलीस गाडीतून गर्भवतीस पोहोचवले रुग्णालयात

नाशिक | प्रतिनिधी 

भारतनगर भागातील शिवाजीवाडी येथील गर्भवती महिलेस प्रसुती कळा येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या मुंबई नाका पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शासकीय वाहनाने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात या महिलेला तिच्या नातेवाईकांसह दाखल केले.  मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला, महिलेसह नातेवाईकांनी मुंबई नाका पोलिसांचे आभार मानले.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, मध्यरात्री १२ . ३० वाजेच्या सुमारास  मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीवाडी, भारत नगर येथील राहणाऱ्या एका गर्भवती महिलेस प्रसुति कळा सुरू झाल्या.

या महिलेला तडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. तिच्या नातेवाईकांनी खाजगी वाहन तसेच १०८ रुग्णवाहिकेची मागणी करून वाहन मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही व नमुद महीलेचा त्रास वाढतच होता.

त्यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशनची विनयनगर बीट मार्शल व त्यावरील पो हवालदार संजय लॉंटे, पोलीस शिपाई अत्तार असे गस्त करीत सदर ठिकाणी पोहचले.

त्यांना याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी प्रसंगवधान ओळखले व त्यांचे मदतीला धावुन गेले, त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनची डी.बी. मोबाईलची मदत मागवली. यानंतर याठिकाणी गुन्हेशोध पथकाचे पोहवा. शिंदे, पोशि. मुंजाळ हेदेखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन तात्काळ स्वतः हुन शासकीय वाहनासह भारतनगर येथे पोहचले.

त्यांनी या गर्भवती महिलेस शासकीय वाहनातुन तिच्या नातेवाईकांसह जिल्हा रूग्णालय गाठून उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या महिलेची सुखरूप  प्रसुति होवुन तिने मुलाला जन्म दिला. या महिलेची व तिच्या बाळाची प्रकृती चांगली असून नातेवाईकांनी पोलीसांचे आभार मानले.

कर्तव्यदक्षतेचे फळ

मुंबई नाका पोलिसांनी रात्री दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले. तर पोलीस उपआयुक्त  अमोल तांबे यांनी या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या