Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिंडोरीचा बाजार आता रोज सीड फार्म आवारात

दिंडोरीचा बाजार आता रोज सीड फार्म आवारात

दिंडोरी : महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय ३० एप्रिल पर्यंत झाल्यानंतर  दिंडोरी नगरपंचायत प्रशासनाने नियोजनात महत्वपूर्ण बदल केला असून दिंडोरीचा बाजार हा वणी रस्त्यावरील सीड फार्म बाजार समिती आवारात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता  दिंडोरीकरांना रोेज भाजीपाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या दिंडोरी शहरात पूर्ण लॉक डाउन असून भाजीपाला विक्रीस बंदी आणण्यात आली आहे. तथापि ३० एप्रिल पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन ची घोषणा केल्यानंतर महसूल, पोलीस, नगर पंचायत प्रशासनाने काही बदल केले आहे.

- Advertisement -

याबाबत दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांनी माहिती दिली. डॉ.पाटील यांनी सांगितले की, नगरपंचायतीचे प्रमुख पदाधिकारी व प्रशासन यांची बैठक होवून लॉकडाऊन काळातील   नियोजनाची चर्चा झाली.

दिंडोरी येथील बाजार आता स्थलांतरीत करण्यात येणार असून तो बाजार वणी रस्त्यावरील सिड फार्म दिंडोरी बाजार समितीच्या मुख्य आवारात भरवण्यात येईल. या ठिकाणी रोज सकाळी ८ ते २ या वेळेत भाजीपाला, फळे , मच्छी व बोंबील विक्री करता येईल.

या ठिकाणी फक्त भाजीपाल्याची वाहतुक करणार्‍या वाहनांना प्रवेश दिला जाईल. कुणालाही वाहने बाजार आवारात आणता येणार नाही. इतरत्र कुठेही दिंडोरी शहरात भाजीपाला विक्रीसाठी विक्रेत्यांना बसता येणार नाही. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी  सात ते आठ दिवसाचा भाजीपाला ग्राहकांना एकदाच घेऊन जावा लागेल. बाजारात येतांना लहान मुलांना बरोबर आणू नये. मास्क नसल्यास कार्यवाही करण्यात येईल.

दिंडोरी शहरातील मटन मार्केट हे रोज सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत सुरु राहील. किराणा व कृषीची दुकाने ही सकाळी ८ ते ४ या वेळेत एक दिवसाआड सुरु राहतील. सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेऊन व्यवहार करायचे आहे. रस्त्यावर कुणीही विनाकारण दिसल्यास पोलिस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दिंडोरी बाजार समितीची जागा प्रांत अधिकारी डॉ.संदिप आहेर यांच्या परवानगीने अधिग्रहीत करण्यात आली असल्याची माहिती  डॉ.मयुर पाटील यांनी दिली. प्रांत डॉ.संदीप आहेर,तहसीलदार कैलास पवार,पोलीस निरीक्षक अनिल बोरसे परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहे.

नागरिकांनी करोनाच्या संसर्गापासून स्वत: चा व कुटूंबियाचा बचाव करण्यासाठी काळजी घेत लॉकडाऊनमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या