Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनिफाड तालुक्यात राबविणार ‘भिलवाडा पॅटर्न’; काय आहे हा ‘पॅटर्न’?

निफाड तालुक्यात राबविणार ‘भिलवाडा पॅटर्न’; काय आहे हा ‘पॅटर्न’?

आमदार दिलीप बनकर यांचा पुढाकार

निफाड | प्रतिनिधी

सध्या संपूर्ण जगात कोव्हीड १९ (कोरोना) आजाराने हाहाकार माजवला आहे. २१० पेक्षा जास्त देशात याचा प्रादुर्भाव आहे. अमेरिका सारख्या सर्वात मोठ्या महासत्तेला पण आज कोरोनासमोर हात टेकण्याची वेळ आली आहे. त्यातच भारतात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात असून नाशिक जिल्ह्यात पहिला रुग्ण हा निफाड तालुक्यात सापडला. व मोठ्या प्रमाणात मालेगाव शहरामध्ये रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे.

- Advertisement -

सदरची साखळी रोखण्यासाठी निफाड तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड तालुक्यात भिलवाडा पॅटर्न राबविणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे
भिलवाडा पॅटर्नमध्ये ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंट हा जो (३टी) फॉर्म्युला आहे.

यासाठी निफाड पंचायत समिती प्रशासनासोबत चर्चा करून संपूर्ण तालुक्यात ८०० पेक्षा जास्त लोकांच्या ३७० टीम तयार करून ग्रामपंचायत निहाय काम सुरू केले आहे. सदर टीममध्ये आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका / मदतनीस, आरोग्य सेवक, सहाय्यक असे कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे.

त्या टीमचे सनियंत्रण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मुख्य सेविका करणार असून त्याचा अहवाल पंचायत समिती स्तरावर एकत्रित केला जाणार आहे.

सदर सर्वेक्षणसाठी एक सर्वसमावेशक असा तक्ता तयार केला असून त्यामध्ये त्या कुटुंब प्रमुखाची माहिती, प्रमुखाचा मोबाईल नंबर, घरातील एकूण व्यक्ती, घरातील कोणी व्यक्ती परदेशात किंवा बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन आली आहेत का?, कोणाला सर्दी, ताप, खोकला, डोके दुखी, घसा दुखी, दम लागणे व इतर असा त्रास आहे का?, कोणी आजारी असेल तर लगेच संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन तपासून पुढीलप्रमाणे त्यांच्यावर उपचार करणे व गरज पडल्यास जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्याकडे पाठवित येणार आहे अशा प्रकारे काम चालणार आहे.

यामाध्यमातून निफाड तालुक्यातील सर्व जनतेने शासनास सहकार्य करावे, हा सर्व्हे आपल्या उज्वल आरोग्यासाठी होणार आहे. ज्याचा परिणाम हा कोरोना सारख्या महामारीला हरवण्यासाठी सर्वानी सर्व्हेसाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले.

रेशनकार्ड चा केला जाणार सर्व्हे

या सर्व्हे मध्ये रेशनकार्ड बाबत पण माहिती घेतली जाणार असून महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत धान्यपुरवठा हा पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक यांना देणार आहेत. परंतु निफाड तालुक्यात असे बरेच कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे अजूनही रेशनकार्ड नाही त्या गरजू कुटुंबियांना या कोरोना कालावधीत विविध संस्थेमार्फत अन्न धान्य पुरवठा करून कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्याचसोबत भविष्यात त्यांना रेशनकार्ड काढण्यासाठी महाराजस्व अभियान घेऊन रेशनकार्ड देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे आमदार बनकर यांनी सांगितले.

बनकरच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध संस्था करत आहे सामाजिक कार्य

आमदार दिलीप बनकर सभापती असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समिती मार्फत सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य, पोलीस, महावितरण, अंगणवाडी व इतर सर्व शासकीय कर्मचारी यांना मास्क, सॅनिटाइझर व इतर साहित्य यांचा पुरवठा केलेला आहे. व संपूर्ण तालुक्यात जो सर्व्हे सुरू आहे त्यासाठी संबंधित सर्व ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटाइझर, हॅण्ड ग्लोज पुरविण्यात आले आहेत. स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, भिमाशंकर ग्रामोदय शिक्षण संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत आदी संस्थांच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथील भिमाशंकर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येआरोग्य शिबीर सुरू करण्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या