Friday, May 3, 2024
Homeनगरवर्षभरात दुसर्‍यांदा वांबोरी चारीला पाणी

वर्षभरात दुसर्‍यांदा वांबोरी चारीला पाणी

पाणी नियोजनासाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे यशस्वी प्रयत्न

करंजी (वार्ताहर)- राहुरी, नगर, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील 43 गावांमधील 102 पाझर तलावात पाणी सोडण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विशेष प्रयत्न करून दोन कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर केला. वांबोरी चारीला मुळा धरणातून वर्षभरात दुसर्‍यांदा पाणी सोडून दुष्काळी भागाला ऐन टंचाईच्या परिस्थितीत दिलासा दिला आहे.

- Advertisement -

मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी मागील काही दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले होते. त्या पाण्यामुळे मढीपर्यंतच्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी पहिल्यांदाच 680 एमसिटी पाणी शासन नियमाप्रमाणे मिळाले. त्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाने नियमावर बोट ठेऊन वांबोरी चारीचा पाणीपुरवठा बंद केला. पाणीपट्टी भरण्याबाबत शेतकर्‍यांना आवाहन केले.

नगर, पाथर्डी तालुक्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडून विशेष बाब म्हणून तातडीचा दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्या निधीतून देखभाल दुरुस्तीसाठी पन्नास लाख, तर वीज बिलापोटी दीड कोटी रुपये दिले. तसेच वांबोरी चारीला पाणी सोडण्यासाठी नामदार जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्यानुसार मुळा धरणातून वांबोरी चारीसाठी पाणी सोडण्यात आले. खोसपुरीजवळ मुख्य पाइपलाईनला गळती लागल्याचे लक्षात आल्यानंतर काही वेळ पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर लगेच दुरूस्ती करून पाणी आता सातवडच्या तलावात पोहचले आहे. कोणकोणत्या तलावात पाणी किती दाबाने पोहचत आहे, याची पाहणी करत ना. तनपुरे तलावावर जावून लाभधारक शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. पाण्याबाबत शेतकर्‍यांनी केलेल्या सूचना ऐकून घेत संबंधित अधिकार्‍यांना तसे आदेश देत असल्याचे दिसून आले.

जोपर्यंत फुटबॉल उघडा पडत नाही, तोपर्यंत पाणी बंद होणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिली. तांत्रिक बाबीचा विचार करता यापूर्वी कधीही या दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना एप्रिल महिन्यामध्ये पाणी मिळाले नव्हते. मात्र नामदार तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे यावर्षी दुसर्‍यांदा वांबोरी चारीला पाणी सोडण्यात आले. नामदार तनपुरे यांचे लाभधारक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न प्रामाणिक असल्याचे उपस्थित शेतकर्‍यांनी बोलून दाखवले.

यावेळी नामदार तनपुरे यांनी लोहसर, सातवड, भोसे, आठरे कौडगाव येथील पाझर तलवांना भेटी देत परिसरातील लाभधारक शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती संभाजीराव पालवे, वांबोरी चारी कृती समितीचे अध्यक्ष अरुणराव आठरे, मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या