Saturday, May 4, 2024
Homeअग्रलेखदूरचित्रवाणीवर शिक्षण; आशादायक प्रकल्प

दूरचित्रवाणीवर शिक्षण; आशादायक प्रकल्प

मार्चपासून सुरू झालेला करोना काळ आणि त्यापाठोपाठच्या प्रदीर्घ टाळेबंदीमुळे देशातील सर्व शाळा तेव्हापासून बंद आहेत.

तारुण्याच्या उंबरठ्यावरील उसळत्या रक्ताच्या मुला-मुलींची काय कुचंबना होत असेल याची कल्पनाच करवत नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंधरा जूनपासून शालेय अभ्यासक्रम ‘ऑनलाईन’ सुरू करण्याचा हुकूम काढला. अनेक शाळांनी हा ङ्गसुरक्षित मार्गफ अवलंबला. त्यामुळे काही शाळा ‘ऑनलाईन’ सुरू आहेत.

- Advertisement -

विद्यार्थी घरबसल्या ठराविक वेळेत अभ्यासाचे धडे गिरवत आहेत. ज्यांच्या घरी मोबाईल, टॅब वा लॅपटॉप आदी साधने आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकणे शक्य होत असेलही, पण खेड्यापाड्यांतील शाळांचे चित्र काय असेल? तेथील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा सहजसाध्य नाहीत. असे विद्यार्थी शिक्षणाला पारखे राहणे साहजिक आहे.

ती बाब सरकारच्या लक्षात आता आली असावी. म्हणून अशा विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन शिक्षण’ प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याची सुरूवात नाशिक जिल्ह्यापासून होत आहे. ‘छोटा पडदा’ (टीव्ही) मुलांचे खास आकर्षण! त्याचाच वापर करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण घरबसल्या पोहोचवण्याचा काहीसा धाडसी, पण कालसुसंगत निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. केबलचालकांच्या मदतीने हा पथदर्शी प्रकल्प राबवला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सर्व संबंधितांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या प्रकल्पावर सांगोपांग चर्चा झाली.

अभ्यासक्रमातील कोणता घटक दूरचित्रवाणीवर प्रामुख्याने शिकवावा याबाबत निर्णय घेण्यासाठी जाणकार मंडळींची समिती नेमली जाणार आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या उपक्रमासाठी पुढे सरसावला ही कौतुकाची बाब आहे. सक्तीच्या रिकामपणामुळे करमणुकीच्या मालिका आणि चित्रपट मुले आवडीने पाहतात. तसे अभ्यासाचे कार्यक्रमही विद्यार्थी पाहतील अशी प्रशासनाची अपेक्षा असावी. करमणूक वाहिनी बदलून ङ्गअभ्यास वाहिनीफ पाहण्यात विद्यार्थी किती रूची दाखवतील ते हळूहळू स्पष्ट होईल.

पालकांनी मनावर घेतले तर दूरचित्रवाणीवर शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकेल, पण येथे केबलजोडणीचा प्रश्न उद्भवू शकतो. कारण घरोघरी दूरचित्रवाणी संच असतील असे गृहीत धरले तरी सर्वच घरी महागडी केबलजोडणी असेलच असे नाही. प्रकल्प राबवताना या अडथळ्यावर मात करण्याचीही पूर्वतयारी ठेवावी लागेल. केबल दूरचित्रवाणीवरून घरोघरी शिक्षण पोहोचवण्याच्या प्रयोगाबाबतही तसे झाले तर शालेय शिक्षण अधिक सुकर बनेल. एक चांगला प्रयत्न म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे.

हा उपक्रम यशस्वी झाला तर महागडे शिक्षण देणार्‍या खासगी आणि इंग्रजी शाळांना जिल्हा परिषद शाळांकडून विधायक स्पर्धा उभी राहील. आधुनिक साधनांचा वापर करून ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे शिवधनुष्य जिल्हा प्रशासन उचलू शकेल. तथापि डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबून सातबारा उतारे ‘ऑनलाईन’ देण्याचे काम अजूनही सुरळीत का होऊ शकले नाही? याचा अभ्यास संबंधितांनी करावा. पंधरवड्यापासून संबंधित खात्याचा सर्व्हर ङ्गडाऊनफ असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे तलाठी ‘तात्यां’ची हाजी-हाजी करण्याची वेळ गरजूंवर आली आहे.

‘घरबसल्या साताबारा’ ही घोषणा वर्षानुवर्षे सरकारकडून दिली जात आहे, पण आजवर किती उतारे ‘ऑनलाईन’ पद्धतीने दिले गेले याचा आढावा कधी घेतला गेला का? अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्याने तसा आढावा कोण घेणार? सुदैवाने शिक्षणाबाबत समाजात जागरूकता वाढली आहे. त्यामुळे दूरचित्रवाणीचा वापर करून शिक्षणाचा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता निश्चितच जास्त वाटते. तसे झाले तर शिक्षकांचा आणि शिक्षणाचा दर्जासुद्धा निश्चित वाढेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या