धुळे – Dhule – प्रतिनिधी :
येथील कमलाबाई कन्या शाळेसमोरील टपरीला सोमवार दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहेत.
आगीत 20 ते 25 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. टपरी शेजारी पडलेला कचरा जाळल्यामुळे आगीची ठिणगी टपरीत गेल्याने टपरीला आग लागली.
शहरातील कमलाबाई कन्या शाळेसमोर विलास धर्मा जाधव आणि ताराबाई विलास जाधव रा. भिडेबाग यांची गोळ्या-बिस्कीट, कुरकुरे विक्रीची टपरी आहे.
जाधव दांम्पत्य भाऊबीजनिमित्त बहिणीकडे सुरत येथे गेले होते. त्यामुळे दुकान बंद होते. या टपरीला सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास आग लागली.
टपरीच्या मागील बाजूला कचरा पडलेला होता. या कचर्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामुळे आगीची ठिणगी टपरीत शिरली. यामुळे टपरीला आग लागली.
टपरीतील वह्या, पेन, पेन्सील, बिस्कीट, कुरकुरे आदी वस्तू जळून खाक झाले. या आगीत 20 ते 25 हजाराचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.